"भारतात राहणारा प्रत्येकजण 'हिंदू' आहे", मोहन भागवत यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 07:52 AM2022-11-16T07:52:09+5:302022-11-16T07:53:21+5:30
Mohan Bhagwat : छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील कार्यालयात स्वयंसेवकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत बोलत होते.
छत्तीसगड : देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती 'हिंदू' (Hindu) आहे आणि सर्व भारतीयांचा (Indians) डीएनए (DNA) समान आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मंगळवारी (15 नोव्हेंबर) केले. तसेच, कोणीही धार्मिक विधी करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील कार्यालयात स्वयंसेवकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी विविधतेतील एकता याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की, ही भारताची प्राचीन विशेषता आहे. संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे, जी सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, "आरएसएसची स्थापना (1925 साली) झाल्यापासून मी ठामपणे सांगत आलो आहे की, भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात आणि या विविधता असूनही एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात, ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत, या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत."
'संघाच्या शाखेत कोणाची जात विचारली जात नाही'
देशात पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंसेवकांची संख्या वाढली आहे. देशभरात झपाट्याने वाढणारा हा संघ अतिशय अनोखा आहे. संघाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण संघाची तुलना कोणाशीही करू शकत नाही. जर आपल्याला संघाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला त्यात सामील व्हावे लागेल. जेव्हा आपण संघात सामील होऊ, तेव्हा संघाची महानता समजून येईल. संघाच्या शाखेत कोणाची जात विचारली जात नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
'सर्व भारतीयांचा डीएनए समान'
संघाचे कार्य वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवणे आणि लोकांमध्ये एकता आणणे आहे, असेही संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले. तसेच, त्यांनी प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करण्यावर भर दिला आणि सांगितले की, सर्व भारतीयांचा डीएनए समान आहे आणि त्यांचे पूर्वज समान आहेत. 40,000 वर्षे जुन्या 'अखंड भारत'चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा डीएनए समान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.