'खासगीकरणाच्या नावानं सगळं विकलं चाललंय, कोट्यवधींच्या नोकऱ्या धोक्यात'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:57 AM2021-12-21T09:57:25+5:302021-12-21T09:58:55+5:30
केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या धोरणावर टीका करताना वरुण गांधी यांनी आता खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे
नवी दिल्ली - भाजपाच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक असलेले वरुण गांधी गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. तसेच ते केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराज असलेले वरुण गांधी हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच ते भाजपाच्या धोरणांवर जाहीरपणे टीका करताना दिसून येत आहेत. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या खासगीकरणावरही त्यांनी टीका केली आहे.
केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या धोरणावर टीका करताना वरुण गांधी यांनी आता खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पीलभीत येथील गांधी सभागृहात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार धोक्यात असल्याचं म्हटलं. खासगीकरणाच्या नावावर सगळं विकलं चाललंय, हा सरकारचा मोठा डाव असल्याचं ते म्हणाले. खासगीकरण आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वच आर्थिक व्यवहारांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीला फायद्याच्य तराजूत तोलणे योग्य नाही. सरकार नोकरी देण्याऐवजी नोकऱ्या काढून घ्यायचं काम करत आहे. त्यामुळेच, आजचा तरुण रोजगाराच्या शोधात भटकंती करत आहे. माझ्यासाठी देश सर्वप्रथम असून राजकारण नंतर, देशासाठी काहीही करायची माझी तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरुन सरकारविरुद्ध संताप
दरम्यान, वरुण गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. तसेत आपल्या वक्तव्यामधून भाजपा आणि भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून वरुण गांधी भाजपाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. तसेच महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य दिनावरून सोशल मीडियावर आक्रमकपणे भूमिका मांडली होती.