'पिठापासून मिठापर्यंत सगळंच महागलं, 71 रुपयांचं पेट्रोल 100 च्या पुढं पोहोचलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:48 AM2021-07-15T07:48:53+5:302021-07-15T07:50:02+5:30

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देशातील महागाईवर परखड शब्दात भाष्य करण्यात आले आहे. महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं असून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

'Everything from flour to salt is expensive, petrol of Rs 71 has gone beyond Rs 100', heavy inflation, says shiv sena to narendra modi | 'पिठापासून मिठापर्यंत सगळंच महागलं, 71 रुपयांचं पेट्रोल 100 च्या पुढं पोहोचलं'

'पिठापासून मिठापर्यंत सगळंच महागलं, 71 रुपयांचं पेट्रोल 100 च्या पुढं पोहोचलं'

googlenewsNext
ठळक मुद्देदेशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागाई थोडीशी कमी झाली, असा दावा सरकारच्या ताज्या आकडेवारीत करण्यात आला आहे. त्यावर विश्वास कोण ठेवणार? महागाईचा घोडा चौखूर उधळला आहे.

मुंबई - कोरोना महामारीमुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. अगोदरच हाताला काम नाही, त्यातच मीठापासून पीठापर्यंत आणि खाद्यतेलापासून पेट्रोल-डिझेलपर्यंत सर्वकाही महागलं आहे. त्यावरुन, शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. गेल्या सरकारच्या काळात 71 रुपयांवर असलेलं पेट्रोलने आज शंभरी पार केलीय, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देशातील महागाईवर परखड शब्दात भाष्य करण्यात आले आहे. महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं असून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागाई थोडीशी कमी झाली, असा दावा सरकारच्या ताज्या आकडेवारीत करण्यात आला आहे. त्यावर विश्वास कोण ठेवणार? महागाईचा घोडा चौखूर उधळला आहे. त्यावर मांड ठोकून लगाम ओढण्याचा कोणताही उपाय सरकार करताना दिसत नाही. छोटा उतारा म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढविण्याचा ताजा निर्णय सरकारने घेतला. काही लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असला, तरी महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. 

कोरोना संकटातील जनतेच्या जखमेवरी मीठ चोळलंय

पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही भडकत आहेत आणि आजपासून तर सीएनजीच्या किमतीमध्येही किलोमागे 2.58 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर एक किलो सीएनजीची किंमत 52 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी सीएनजीची ही दरवाढ म्हणजे मोठाच झटका आहे. सीएनजीसोबतच घरगुती पाइपलाइन गॅसची किंमतही प्रत्येक युनिटमागे 55 पैशांनी वाढविण्यात आली आहे. आधीच कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. 

पिठापासून मिठापर्यंत सगळंच महागलं

पिठापासून मिठापर्यंत, चहा-साखरेपासून भाजीपाल्यापर्यंत, अन्न-धान्यापासून खाद्यतेलांपर्यंत, बियाणांपासून खतांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळ्याचेच भाव भडकले आहेत. महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाही. 

71 रुपयांचं पेट्रोल शंभरी पार

केंद्रात लागोपाठ दोन वेळा भाजपचे सरकार बहुमताने निवडून दिले. मात्र, सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी केंद्रीय सरकारला महागाईचा राक्षस अजूनही मारता आलेला नाही. उलट महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतोच आहे. महागाईवर तर मार पडली नाही आणि गोरगरीबांच्या खिशावरचा मार मात्र वाढला. 71 रुपये लिटर मिळणाऱया पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली. 55 रुपये लिटरचे डिझेल शंभरीच्या घरात पोहचले. 410 रुपयांना मिळणारा स्वयंपाकाचा गॅस या सरकारच्या काळात दुपटीहून अधिक वाढला आहे. पेट्रोल-डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून सरकारनेच सीएनजीचा पुरस्कार सुरू केला, पण आज तर मध्यमवर्गीयांच्या या इंधनाचेही दर सरकारने वाढवून ठेवले.

Web Title: 'Everything from flour to salt is expensive, petrol of Rs 71 has gone beyond Rs 100', heavy inflation, says shiv sena to narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.