निसर्गापुढे सगळं थांबलय, सोनूने पहिल्यांदाच मोदी सरकारकडे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:24 AM2020-08-26T11:24:31+5:302020-08-26T11:28:18+5:30
मी स्वत: इंजिनिअर आहे, या परीक्षांसाठी विद्यार्थ्याना गाव-खेड्यातून आणि दुर्गम भागातून यावे लागते. सद्यस्थितीत बिहारच्या काही गावांमध्ये पूर आहे, तर कुठे जिल्हा बंदी. परीक्षा घेणे आवश्यक आहे, पण...
नवी दिल्ली - नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एन्ट्रान्स एक्झाम पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोकसभेतील गटनेता अधीर रंजन चौधरी यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती. त्यानंतर, भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीचा सरकारला घरचा अहेर दिला आहे. तर, अभिनेता आणि आपल्या कामामुळे रिअल हिरो ठरलेल्या सोनू सूदनेही पंतप्रधान मोदींकडे परीक्षांसदर्भात मागणी केली आहे.
इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनीही हीच मागणी लावून धरली. आता, सुब्रमण्यम स्वामी यांनीही या मुद्द्यावरुन सराकरला लक्ष्य केले आहे. आता, सोनू सूदनेही देशातील परिस्थिती आणि पूरस्थितीचा संदर्भ देत सद्यपरिस्थितीच JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
#NEETJEE परीक्षा में बैठने वाले बच्चे सुदूर इलाकों से आते हैं।बिहार के किसी गांव में बाढ़ है तो किसी जिले में पूरी बंदी। हां,परीक्षा जरूरी है लेकिन उन युवा कंधो की हिफ़ाज़त भी उतनी ही जरूरी है।पूरे विश्व में सबकुछ प्रकृति के सामने ठहर गया तो परीक्षा को कुछ वक्त के लिए टालना चाहिए pic.twitter.com/QABfYbPcsX
— sonu sood (@SonuSood) August 25, 2020
मी स्वत: इंजिनिअर आहे, या परीक्षांसाठी विद्यार्थ्याना गाव-खेड्यातून आणि दुर्गम भागातून यावे लागते. सद्यस्थितीत बिहारच्या काही गावांमध्ये पूर आहे, तर कुठे जिल्हा बंदी. परीक्षा घेणे आवश्यक आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या जीवाचाही काळजी आपणच करायला हवी. निसर्गापुढे जगभरात सर्वकाही थांबलय, म्हणूनच परीक्षा काही वेळेसाठी थांबायलाच हव्यात, असे ट्विट सोनूने केले आहे. बिहार, आसाम आणि गुजरातमधून 26 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत, पूरस्थितीत अडकलेल्या या विद्यार्थ्यांना सपोर्ट करायलाच हवा, असेही सोनूने म्हटलंय.
सुब्रमण्यम स्वामींची मागणी
सद्यपरिस्थिती जेईई व नीट परीक्षा घेणे म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का? सरकारच्या हे लक्षात येत नाही का? असा प्रश्न स्वामींनी विचारला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे परीक्षांच्या तयारीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला आहे. ना इंटरनेटची सुविधा, ना लायब्ररीला जाण्याची सोय. त्यामुळे, NEET अभ्यासही झाला नाही. पंतप्रधान नरेंद मोदी याबद्दल नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार करतील, असे ट्विटर सुब्रमण्यम स्वामींनी केले आहे.
ममता बॅनर्जींची मागणी
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको, असे म्हणत सुरक्षित आणि निर्भय वातावरणात परीक्षा पार पडाव्या, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या NEET आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी मागणीही बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
काँग्रेसचीही तीच मागणी
दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या आणि कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. या महामारीच्या संकटात केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्याही तयार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय.