भाजपा नेत्याच्या गाडीत EVM आढळल्याने गोंधळ, आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 12:58 PM2021-04-02T12:58:39+5:302021-04-02T12:59:33+5:30
भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते.
नवी दिल्ली - देशातील 5 राज्यात सुरु असलेल्या निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, मारहाणीच्याही घटना समोर येत आहेत. मात्र, आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आली आहे. विशेष म्हणजे ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं सांगण्यात येतंय. यासंदर्भात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट केलंय. त्यानंतर, निवडणूक आयोगाने संबंधित 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत, निवडणूक आयोगाने तपास करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन भाजपावर आरोप केले आहेत.
Presiding Officer was issued show-cause notice for
— ANI (@ANI) April 2, 2021
violation of transport protocol. PO & 3 other officials placed under suspension. Although EVM's seals were found intact it has been decided to do a re-poll at No 149- Indira MV School of LAC 1 Ratabari(SC): EC on Assam EVM issue pic.twitter.com/wwTbIdooYt
भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते. त्यानंतर, याप्रकरणी निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये, एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच, ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाची गाडी खराब झाली होती, त्यामुळे भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट मागण्यात आली, अशी प्राथमिक माहिती आहे.
पोलिंग बुथवर पुन्हा मतदान
निवडणूक आयोगाने तपासाअंती कारमधील ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलंय. तसेच, ईव्हीएमसह बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट मशिनला स्ट्राँग रुममध्ये सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहे. तरीही, खबरदारी म्हणून रताबारी विधानसभा क्षेत्रातील पोलिंग स्टेशन इंदिरा एम.वी. स्कूलच्या पोलिंग बूथ नंबर 149 येथे पुन्हा एकदा मतदान घेण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे.