EVM मशीनमध्ये बिघाड नव्हता, मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 10:01 AM2018-05-29T10:01:48+5:302018-05-29T14:14:09+5:30
सोमवारी झालेल्या 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र इव्हीएममध्ये बिघाड असल्याचे वृत्त मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी फेटाळून लावले आहे.
नवी दिल्ली - सोमवारी झालेल्या 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र इव्हीएममध्ये बिघाड असल्याचे वृत्त मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी फेटाळून लावले आहे. सोमवारी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या इव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नव्हता. मात्र पहिल्यांदाच वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनबाबत काही ठिकाणांहून तक्रारी आल्या होत्या," असे ओ. पी. रावत म्हणाले.
There were absolutely no problems in EVMs yesterday, yes problems were noticed in the VVPATs which was used for the first time in these constituencies and by the polling parties: Chief Election Commissioner OP Rawat to ANI (file pic) #bypollspic.twitter.com/shLCeClBfg
— ANI (@ANI) May 29, 2018
लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या १0 अशा १४ जागांसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले असले, तरी पालघर, गोंदिया-भंडारा व यूपीतील कैराना लोकसभा मतदार संघांत ईव्हीएम (मतदान यंत्रे) बंद पडण्याचे, त्यात गडबड केल्याचे व विरोधी उमेदवारासमोरील बटन दाबले जात नसल्याच्या इतक्या तक्रारी आल्या की, ही यंत्रे म्हणजे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, काही यंत्रांमध्ये कडक ऊन आणि धुळीमुळे बिघाड झाल्याचे पालघरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालघरमध्ये तब्बल २७६ मतदानयंत्रे बंद पडली, तर भंडारा-गोंदियामध्ये ७५ बुथवरील मतदानयंत्रे काम करीत नसल्याच्या १४१ तक्रारी आल्या. यंत्रे बंद पडल्याने अनेक मतदारांना परत जावे लागले. जिथे ही यंत्रे बंद पडली, तिथे दुसरी बसविली, तिथे मतदानास अधिक वेळ देत आहोत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले, पण घरी निघून गेलेले लोक अनेक ठिकाणी पुन्हा मतदानाला आलेच नाहीत. गोंदिया-भंडारामधील गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणा-या ३४ बुथमधील मतदान बंदच राहिले. तिथे अतिरिक्त मतदान यंत्रे नसल्याने हा प्रकार घडला. पालघरमध्ये ४६.५० टक्के आणि गोंदिया-भंडारामध्ये ४२ टक्के मतदान झाले.
शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी पालघरमधील गोंधळ जाणूनबुजून असल्याचा आरोप केला. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आ. हितेंद्र ठाकूर म्हणाले की, आमची जिथे विशेष ताकद आहे, त्याच भागांतील मतदान यंत्रांमध्येच कसा बिघाड झाला, याची चौकशी व्हायला हवी.मतदान यंत्रांमुळे उडालेला गोंधळ व उन्हाचा तडाखा, यामुळे पोटनिवडणुकांत मतदान कमीच झाल्याचे दिसून आले. सर्व ठिकाणी मतमोजणी ३१ मे रोजी होईल.
फेरमतदानाची आवश्यकता नाही : आयोग
विरोधकांनी मतदान यंत्रांविषयी केलेल्या तक्रारी जरा अतीच आहेत, तितका गोंधळ झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. कुठेही आज मतदान रद्द केलेले नाही व फेरमतदानाची गरज नाही, अशी भूमिका आयोगाने घेतल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत.