ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील नोंदींचा हिशेब १०० टक्के जुळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 09:36 IST2021-06-04T09:36:00+5:302021-06-04T09:36:21+5:30
विधानसभा निवडणुकांतील मोजणी; यंत्रांची अचूकता सिद्ध

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील नोंदींचा हिशेब १०० टक्के जुळला
नवी दिल्ली : तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्ये व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) व व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल्स (व्हीव्हीपॅट) यांच्यातील नोंदींचा हिशेब १०० टक्के जुळला आहे. त्यामुळे या यंत्रांची विश्वासार्हता व अचूकपणा सिद्ध झाला असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ईव्हीएम हे यंत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने १९८९ साली बनवून घेतले होते, तर व्हीहीपॅट या यंत्राचा २०१९च्या लोकसभा निवडणुकांत सर्व मतदारसंघात वापर करण्यात आला होता. त्याच्या आधी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत व्हीव्हीपॅट यंत्रे फक्त आठ मतदारसंघांमध्ये वापरण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये १४९२, तामिळनाडूमध्ये ११८३, केरळमध्ये ७२८, आसाममध्ये ६४७ व पुडुचेरीमध्ये १५६ व्हीहीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला होता. २०१९च्या निवडणुकांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघांत पाच व्हीव्हीपॅट यंत्रांमधील स्लीपची हाताने मोजणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.