मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 05:05 PM2019-09-09T17:05:55+5:302019-09-09T17:07:08+5:30
माझ्या तरुण मुलासाठी मी काहीही करू शकलो नाही. विवेकला गायक होण्यासाठी मदत करावी, अशी विनंती दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
नवी दिल्ली - वायुसेनेचे निवृत्त अधिकारी बिजन दास यांनी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथील एका हॉटेलात आत्महत्या केली. मुळचे आसामचे असलेले दास यांनी मृत्यूपूर्वी पाच पानांची सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये दास यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
दास यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये देशातील आर्थिक मंदीसाठी माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांना जबाबदार ठरवले आहे. तसेच मंदीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे दास यांनी पुढे म्हटले. ५५ वर्षीय दास यांनी येथील खुलदाबाद येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
दास यांच्या खोलीत सुसाईड नोट व्यतिरिक्त अत्यंविधीसाठी १५०० रुपये आणि हॉटेलचा किराया ५०० रुपये आढळून आले. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार दास यांनी सुसाईड नोटमध्ये युपीए सरकारमधील घोटाळे आणि चुकीच्या आर्थिक धोरणांचा उल्लेख केला. आर्थिक मंदीमुळेच आपण निवृत्तीनंतर काहीही करू शकलो नाही, असंही दास यांनी नमूद केले आहे.
एखाद्या सरकारने चुकीची आर्थिक निती केली, तर त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. त्याचा परिणाम अनेक वर्षांनंतर दिसून येतो. त्यामुळे आर्थिक मंदीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. नोटबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर तत्काळीक परिणाम झाला आहे. मात्र देशातील आर्थिक मंदीसाठी या निर्णयांना जाबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगत दास यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी झालेल्या अटकेचा उल्लेख केला आहे.
दास पुढे म्हणाले की, माझ्या मुलाचे नाव विवेक दास असून त्याला गायक व्हायचं आहे. विवेकने 'सारे गा, मा,पा, मध्ये देखील सहभाग घेतला आहे. परंतु, माझ्या तरुण मुलासाठी मी काहीही करू शकलो नाही. विवेकला गायक होण्यासाठी मदत करावी, अशी विनंती दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.