माजी नोकरशहांनी लिहिलं राष्ट्रपतींना पत्र, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:50 AM2019-04-09T11:50:04+5:302019-04-09T11:51:01+5:30
देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन राजकीय पक्षांच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीही एकमेकांच्याविरोधात देत आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी येत निवडणूक आयोगाकडे येत असताना त्या तक्रारींची निपक्ष:पाती चौकशी व्हावी ही मोठी जबाबदारी निवडणूक आयोगाला पार पाडावी लागणार आहे. मात्र देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे.
66 माजी नोकरशहा वर्गाने देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र आचारसंहितेचे पालन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या नोकरशहांनी लिहलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की, ऑपरेशन शक्ती दरम्यान अॅन्टी सॅटेलाईट मिसाइलचं यशस्वी परीक्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भाषण केले. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी बायोपिक आला. मोदी यांच्या योजनांची माहिती देणाऱ्या वेबसिरीज आणि मालिका आल्या. भाजपाच्या अनेक नेत्यांची वादग्रस्त विधाने ज्यावर निवडणूक आयोगाकडे अनेक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आल्या मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून दिखाव्यापुरती कारवाई करण्यात येतेय असं या पत्रात नमूद केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहणाऱ्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, पंजाबचे माजी डीजीपी जुलिरो रिबेरो, प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार आणि ट्रायचे माजी चेअरमन राजीव खुल्लर यांच्यासारख्या माजी नोकरशहांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग आणि मनमानी पद्धतीने आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचं काम होत आहे. त्यांच्या अशा कारभारामुळे निवडणूक आयोगाची कोणत्याही प्रकारची भिती त्यांच्या मनात नाही असा आरोप पत्रात केला आहे. पीएम नरेंद्र मोदी यांचा बायोपिक, चहाच्या कपवर मै भी चौकीदार असा उल्लेख तर मालिकांमधून मोदींच्या योजनेचा प्रचार या माध्यमातून होणाऱ्या आचारसंहितेचं उल्लंघन थांबविण्याची मागणी माजी नोकरशहांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे.