"मी आधी शेतकऱ्याचा मुलगा, मग नेता", मोदी सरकारमधील माजी मंत्र्याचा शेतकऱ्यांना पाठिंबा
By मोरेश्वर येरम | Published: December 18, 2020 08:05 PM2020-12-18T20:05:00+5:302020-12-18T20:10:59+5:30
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते.
रोहतक
केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे बीरेंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी आपण सरकारविरोधात नसून शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं.
"सर छोटूराम विचारमंचचा मी स्थायी सदस्य आहे. सर छोटूराम यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी मोठं काम केलं होतं. छोटूराम विचारमंचाने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या विचारमंचाचा मी सदस्य असल्यानं मीही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा आहे", असं बीरेंदर सिंग म्हणाले.
शेतकऱ्यांची बाजूनं असताना तुम्ही ज्या पक्षाचे सदस्य आहात. त्या पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत. याबाबतही बीरेंदर यांना विचारण्यात आलं. "शेतकऱ्यांचं समर्थन करणं म्हणजे पक्षाच्या विरोधात जाणं असा अर्थ होत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा राजकारणापेक्षा मोठा आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझा जन्म झाला आहे. त्यानंतर मी पुढे राजकारणात आलो. त्यामुळे आपल्या मातृभूमीला विसरणं शक्य नाही. शेतकऱ्यांना साथ देणं हे माझं कर्तव्य आहे", असं बीरेंदरसिंग म्हणाले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी बोलायला हवं. चर्चेनेच समस्येवर तोडगा निघतो. सरकारसोबत एक सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण चर्चा करण्याची शेतकऱ्यांनीही तयारी ठेवावी, कारण आंदोलनात ना शेतकऱ्यांचं हित आहे, ना सरकारचं", असंही ते पुढे म्हणाले.