ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक कोचर यांना अटक; सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 10:50 PM2022-12-23T22:50:20+5:302022-12-23T23:04:02+5:30
ICICI Bank: आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ICICI Bank: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक अन्वेषण विभागाने दिल्लीत अटक केली आहे. व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या कारवाई करण्यात आली आहे.
CBI has arrested former MD & CEO of ICICI bank Chanda Kochhar & Deepak Kochhar in the alleged ICICI bank - Videocon loan fraud case
— ANI (@ANI) December 23, 2022
(File Picture) pic.twitter.com/I7kmu09pjE
चंदा काेचर यांनी मे २००९ मध्ये आयसीआयसीआय बँकेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचा आरोप आहे. हे कर्ज २०१७ मध्ये एनपीएमध्ये गेले. या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांना व्हिडीओकॉनकडून ६४ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉन समूहातील एक कंपनी ‘नूपॉवर रिन्युएबल्स’च्या माध्यमातून हा पैसा दीपक कोचर यांच्या कंपनीला मिळाला, असे ईडीने म्हटले होते.
दरम्यान, आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने जानेवारी २०१९ मध्ये चंदा कोचर यांना पदावरुन हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच त्यांचे एप्रिल २००९ ते मार्च २०१८ या कालावधीत मिळालेला ७.४ कोटी रूपयांचा बोनस परत करण्याचे आदेश देत त्यांचे अन्य आर्थिक भत्तेही रोखण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात चंदा कोचर यांनी बँकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
आयसीआयसीआय बँकेचे नेमके प्रकरण काय?
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन संबंधी दिलेल्या कर्ज घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, कंपनीचे वेणुगोपाल धूत यांचे आरोपपत्रात नाव आहे. दीपक कोचर हे व्हिडिओकॉनची उपकंपनी असलेल्या न्यू पॉवर या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. चंदा कोचर यांनी या कंपनीला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, पुढे ते कर्ज बुडीत खात्यात गेले. याप्रकरणी ईडीने २०१८ पर्यंत चौकशी केली होती. यानंतर ईडीने धूत व कोचर दाम्पत्याविरोधात पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईनंतर व्हिडिओकॉनच्या मालमत्तांवर सीबीआयने देखील गुन्हा दाखल करत छापे मारले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"