"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 12:55 PM2024-05-07T12:55:39+5:302024-05-07T13:00:03+5:30
Lok Sabha Election 2024 : कर्नाटकातील १४ लोकसभेच्या जागांसाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली.
बंगळुरू : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून विविध भागातील प्रत्येक मतदान केंद्रांवर रांगा लावून नागरिक मतदान करत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपा राज्यात किमान २५ ते २६ जागा जिंकेल, असा दावा बीएस येडियुरप्पा यांनी केला.
कर्नाटकातील १४ लोकसभेच्या जागांसाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. बीएस येडियुरप्पा यांनी शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा येथे पुत्र व शिमोगा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार बी. वाय राघवेंद्र आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासमवेत मतदान केले. दरम्यान, राज्यात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. कर्नाटकातील बहुतांश दक्षिणेकडील आणि किनारी जिल्ह्यांमधील १४ इतर जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान पूर्ण झाले.
मतदानानंतर बीएस येडियुरप्पा म्हणाले, "माझ्या मते, आम्ही (भाजपा) लोकसभेच्या २८ पैकी किमान २५ ते २६ जागा जिंकणार आहोत. वातावरण खूप चांगले आहे. आपण जिथे जातो तिथे लोक 'मोदी-मोदी' म्हणतात. याचा परिणाम होणार आहे. आम्हाला खात्री आहे की, राघवेंद्र (शिमोगामध्ये) २.५ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी होतील. ज्या १४ जागांसाठी मतदान झाले आहे, त्या सर्व १४ जागांवर विजयाचा आम्हाला विश्वास आहे. उरलेल्या एक-दोन जागांवर काही चढ-उतार झाले तरी माझ्या मते आपण २५-२६ जागा जिंकू. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे आहे."
याचबरोबर, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने २५ जागा जिंकल्या होत्या आणि यावेळी देखील भाजपा-जनता दल (सेक्युलर) युती त्या सर्व जागा राखून 'नवा विक्रम' प्रस्थापित करेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री एस. च्या. शिवकुमारांवर पडेल. काँग्रेस आपल्या गॅरंटीच्या जोरावर २० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या भ्रमात आहे. त्यांना ४ जूनला मतमोजणीच्या दिवशी धक्का बसणार आहे. काँग्रेसच्या तात्पुरत्या गॅरंटीपेक्षा मोदींच्या कायमस्वरूपी गॅरंटीवर जनतेचा अधिक विश्वास आहे.