माजी सैनिक गरेवाल हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते
By Admin | Published: November 5, 2016 05:58 AM2016-11-05T05:58:13+5:302016-11-05T05:58:13+5:30
गरेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल शंका उपस्थित करणारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. से. सिंग यांनी आता गरेवाल हे काँग्रेसचे होते
नवी दिल्ली : माजी सैनिक रामकिशन गरेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल शंका उपस्थित करणारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. से. सिंग यांनी आता गरेवाल हे काँग्रेसचे होते, असा शोध लावला. काँग्रेस व आम आदमी पार्टी त्यांच्या आत्महत्येचा राजकारणासाठी वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सिंग यांनी यापूर्वी पत्रकारांना उद्देशूनही अतिशय वाईट भाषेचा वापर केला होता. स्वत: अनेक वर्षे सैन्यात घालविलेल्या सिंग यांनी एका जवानाच्या मानसिक अवस्था व राजकीय पक्ष यांचा उल्लेख करून, त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत, अशी टीका दिल्लीत सुरू आहे. ते म्हणाले : हे दोन्ही पक्ष मृतदेहांचा वापर पक्षीय कारणांसाठी करीत आहेत. त्यांना ओआरओपीबद्दल त्यांना काहीही माहिती नाही, अनेक सैनिक हुतात्मा झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसचा एक तरी नेता कधी गेला का? असा प्रश्न त्यांनी विचारला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>तमिळनाडूमध्ये काँग्रेसची निदर्शने : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ओआरओपी प्रश्नावर दिल्लीत स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेसच्या तमिळनाडू शाखेतर्फे निदर्शने करण्यात आली. या वेळी पक्षाच्या सर्व गटांचे नेते व कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र आले होते.