माजी सैनिकाची आत्महत्या
By admin | Published: November 3, 2016 06:39 AM2016-11-03T06:39:42+5:302016-11-03T06:39:42+5:30
केंद्र सरकारने आजी व माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी न केल्यामुळे हरियाणातील राम किशन गरेवाल या माजी सैनिकाने दिल्लीत आत्महत्या
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आजी व माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी न केल्यामुळे हरियाणातील राम किशन गरेवाल या माजी सैनिकाने दिल्लीत आत्महत्या केल्यानंतर, त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि संध्याकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे वातावरण प्रचंड तापले. सैनिकाच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे लोकांच्या संतापात भरच पडली. संतापलेल्या राहुल गांधी यांनी ‘तुम्हाला काही लाज, शरम आहे का? आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या मुलालाच तुम्ही अटक करता?’ अशा शब्दांत पोलिसांना सुनावले.
या निमित्ताने वन रँक, वन पेन्शन हा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रश्नावर आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्याबाबत निर्णय घेत नसल्यानेच हा प्रकार घडला असल्याची टीका राहुल यांनी केली. या आत्महत्येचे राजकारण करू नये, अशी विनंती माजी सैनिकांच्या संघटनेने केली आहे. मनोहर पर्रीकर यांनी या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या राज्यात किसान आणि जवान आत्महत्या करीत आहेत, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा प्रकार अजब आहे, त्यांना ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला मंत्रिमंडळाची बैठक रद्द करावी लागली, असेही त्यांनी बोलून दाखवले.
गरेवाल यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आला. तिथे त्यांचे सर्व नातेवाईकही आले होते. त्यांना भेटण्यासाठी मनिष सिसोदिया तिथे जाताच, त्यांना पोलिसांनी अडविले आणि नंतर ताब्यात घेतले. त्यानंतर, राहुल गांधी हेही गरेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तिथे गेले. त्यांनाही
अडवण्यात आले. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, किरण चौधरी यांनाही पोलिसांनी रुग्णालयात प्रवेश करू दिला नाही. संध्याकाळी केजरीवाल यांनाही रुग्णालयाबाहेरून ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>मनोहर पर्रीकरांनी भेट नाकारली?
आत्महत्या करणाऱ्याचे नाव सुबेदार राम किशन गरेवाल असून, हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील बामला गावात ते राहत होते. ते ३0 वर्षे सैन्यात काम करीत होते. दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या जवळ असलेल्या जवाहर भवनच्या मागील भागात त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. तेथून जवळच असलेल्या जंतर मंतर भागात वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिक व अधिकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. राम किशन गरेवाल यांना वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट हवी होती. मात्र, त्यांनी भेट नाकारल्याने राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे सांगण्यात आले. वडिलांनी आम्हाला फोन केला होता. वन रँक वन पेन्शनसंबंधीच्या आमच्या मागण्या सरकार पूर्ण करीत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली .
>काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको
राहुल गांधी यांना अटक करण्यात आल्याची अफवा दिल्लीत पसरली. त्यामुळे केवळ दिल्लीतीलच नव्हे, तर अन्य राज्यातील काँग्रेस कार्यकर्तेही पक्ष कार्यालयांपुढे गर्दी करू लागले. त्यांनी आंदोलन करण्याचे ठरवले.दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोची तयारी सुरू केली. काही ठिकाणी त्यांनी रस्ते रोखले. या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांची धावपळ सुरू झाली. राहुलना अटक झालेली नाही, असे कार्यकर्त्यांना नंतर कळले. काँग्रेसचे अनेक नेते अक्षरश: घाईघाईने मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात गेले. राहुल गांधींना अटक झाल्यास त्यांना जामीन देता यावा, अशी तयारीही त्यांनी सुरू केली, पण प्रत्यक्षात राहुलना अटक झालेलीच नव्हती.राहुल गांधी यांनी गरेवाल यांच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त करतानाच, मृतांच्या नातेवाईकांना न भेटू देण्याच्या सरकारच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले की, ‘सरकारला लोकशाही मान्य नाही, असेच दिसत आहे. मोदी यांचा नवा भारत असाच बनवायचा आहे की काय?’ असा सवालही त्यांनी केला. राहुल यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच, काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली होती. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी गरेवाल यांच्या आत्महत्येचा मुद्दा जोरात लावून धरल्याने, काही काळ भाजपा नेत्यांनाही काय प्रतिक्रिया द्यावी, हे कळेना. ते गोंधळूनच गेले होते. नंतर मात्र, गरेवाल यांना वन रँक वन पेन्शन हे तत्त्व लागू झाले होते, पण गेल्या महिन्याच्या पगारात त्यात गोंधळ झाल्याने ते अस्वस्थ होते आणि त्यातून हा प्रकार घडला, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.