मोदींची शिष्टाई माजी सैनिकांनी धुडकावली
By admin | Published: August 18, 2015 10:21 PM2015-08-18T22:21:43+5:302015-08-18T22:21:43+5:30
माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शनसाठी (ओआरओपी) जंतरमंतरवर चालविलेले आंदोलन मागे घ्यावे यासाठी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा
नवी दिल्ली : माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शनसाठी (ओआरओपी) जंतरमंतरवर चालविलेले आंदोलन मागे घ्यावे यासाठी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी निदर्शनकर्त्यांच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी केलेली चर्चा निष्फळ ठरली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा प्रस्तावही धुडकावत आणखी दहा दिवस तरी आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही माजी सैनिकांनी दिला आहे.
मंगळवारी आणखी एका माजी सैनिकाने बेमुदत उपोषण सुरू केल्याने उपोषणकर्त्यांची संख्या तीन झाली आहे. ६५ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मिश्रा यांनी सकाळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आश्वासन दिल्याखेरीज मागे हटणार नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे अध्यक्ष लेप्ट. जन. (निवृत्त) बलबीरसिंग यांनी म्हटले.
आम्ही याआधीच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत चर्चेच्या फेऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेसाठी दहा दिवसांची मुदत मागितली आहे. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे मेजर जन. (निवृत्त) सतबीरसिंग यांनी सांगितले. ओआरओपीची व्याख्या कायम ठेवतानाच या योजनेच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन मागितले.
१ एप्रिल २०१४ पासून सरकारने ही योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्यावर ठाम राहावे, असे आम्ही स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. बलबीरसिंग यांच्यासोबत त्यांनी मिश्रा यांची भेट घेतली होती. यापूर्वी दोन माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)