"सुखबीरसिंग यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी हल्ल्यापूर्वी पोलिसांसोबत होता";अकाली नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:37 IST2024-12-05T17:31:47+5:302024-12-05T17:37:57+5:30
गोळीबाराआधी नारायण सिंह चौडा याने काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाने केलाय

"सुखबीरसिंग यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी हल्ल्यापूर्वी पोलिसांसोबत होता";अकाली नेत्याचा दावा
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बुधवारी शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर नारायण सिंह चौडा नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल धार्मिक शिक्षा म्हणून पहारा देत असताना सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडली. पोलिसांनी नारायण सिंह चौडाला तात्काळ ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आता हल्ल्याआधी नारायण सिंह चौडा याने काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाच्या नेत्याने म्हटलं आहे.
शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी दावा केला की सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करणारा माजी दहशतवादी नारायण सिंह चौरा हा अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याशी हात मिळवताना दिसला होता. मजिठिया यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात हल्लेखोर चौरा हा एका व्यक्तीला भेटताना आणि बोलत असल्याचे दिसत आहे. ज्या व्यक्तीशी हल्लेखोर हात हलवत होता ते एसपी हरपाल सिंग होते असा दावा बिक्रम सिंह मजिठिया यांनी केली आहे.
अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांना उद्देशून मजिठिया यांनी एक पोस्ट लिहीली आहे. "जेव्हा सुखबीर सिंग बादल सेवा करत होते, तेव्हा तुमचे पोलिस अधीक्षक हरपाल सिंह माजी दहशतवादी नारायण चौरा यांच्याशी हस्तांदोलन करत होते. यावर कधी बोलणार? तुमच्याकडे काही उत्तर आहे का?," असा सवाल मजिठिया यांनी केला आहे.
बुधवारी, सुखबीर सिंग बादल हे थोडक्यात बचावले होते. नारायण चौरा या माजी बब्बर खालसा इंटरनॅशनल दहशतवाद्याने सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार केला होता.व्हीलचेअरवर बसलेला बादल गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर होते. जेव्हा चौराने त्याची बंदूक बाहेर काढली तेव्हा तो हल्ला करण्यासाठी पुढे आला. मात्र बादल यांच्याजवळ उपस्थित असलेल्या मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चौराला पकडले.