चंद्रावर पडलेल्या ‘विक्रम’चा नेमका ठावठिकाणा समजला; ऑर्बिटरने टिपले चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:43 AM2019-09-09T01:43:54+5:302019-09-09T01:44:25+5:30
इस्रोप्रमुख म्हणाले : , सुस्थितीबद्दल सांगू शकत नाही, १४ दिवसांचे आयुष्य संपेपर्यंत पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न
निनाद देशमुख
बंगळुरु: पृथ्वीपासून ३.८० लाख किमीचा प्रवास पूर्ण करून चंद्रापासून दोन किमी एवढे जवळ गेल्यावर अचानक संपर्क तुटलेले ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील ‘विक्रम लॅण्डर’ चंद्रावर नेमके कुठे पडले आहे, याचा ठावठिकाणा लागला असल्याची शुभवार्ता भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) देशवासियांना रविवारी दिली. मात्र ‘विक्रम’ कोणत्या स्थितीत पडले व त्याच्यासह त्याच्या पोटातील ‘प्रज्ञान’ या रोव्हरमधील अत्यंत नाजूक वैज्ञानिक उपकरणांची स्थिती काय आहे, याचे आकलन होऊ शकले नाही.
‘विक्रम’चे १४ दिवसांचे निर्धारित आयुष्य संपेपर्यंत त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न सातत्याने केले जातील. त्यामुळे आम्ही आशा सोडलेली नाही, असे शनिवारी ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी सांगितले होते. याच्या थोडे पुढे जात डॉ. सिवान रविवारी म्हणाले की, चंद्राभोवती घिरट्या घालणाऱ्या ‘चांद्रयान-२’ने पाठविलेल्या ‘थर्मल’ छायाचित्रांवरून ‘विक्रम’ नेमके कुठे आहे, ते ठिकाण कळले आहे. पण त्याच्याशी अद्याप संपर्क प्रस्थापित करता आलेला नाही. ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले की, ‘थर्मल’ छायाचित्रावरून अमूक ठिकाणी अमूक वस्तू आहे, एवढेच कळते. ती कोणत्या स्थितीत आहे हे कळण्याएवढा तपशिल त्यातून मिळत नाही. मात्र ‘आॅर्बिटर’ चोखपणे काम करत आहे, याची मात्र यावरून खात्री पटते. ते त्याच ठिकाणावरून पुन्हा घिरटी घालताना कदाचित याहूनही अधिक माहिती देणारे छायाचित्र मिळेल, अशी आशा आहे.
‘विक्रम’शी संपर्क तुटला असे सांगणाºया ‘इस्रो’ने हे लॅण्डर अलगदपणे चंद्रावर उतरविण्यात अपयश आल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र ‘विक्रम’ अलगद न उतरता नक्कीच चंद्रावर काही प्रमाणात आदळले असणार, हे डॉ. सिवान यांच्या बोलण्यावरून अप्रत्यक्षपणे ध्वनित झाले. तसे असेल तर त्याचे काही नुकसान झाले असू शकते का, यावर त्यांनी ‘ते मात्र नक्की सांगता येत नाही’, असे उत्तर दिले.
पाठिंब्याने नवा हुरूप
‘विक्रम’ चंद्रावर अलगद उतरू न शकल्याचे कळल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला धीर व देशभरातून व्यक्त होत असलेल्या पाठिंब्याने ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांना नवा हुरूप आला आहे, असे डॉ. सिवान म्हणाले. ‘इस्रो’चे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले की, पंतप्रधान आणि देशवासीय ठामपणे पाठिशी उभे राहिल्याने आम्ही सर्वच भारावून गेलो आहोत. त्या क्षणाला आम्ही याची कल्पनाही केली नव्हती.
‘नासा’कडूनही कौतुक : ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने कौतुक करताना म्हटले की, अवकाशातील कामगिरी कठीणच असते. ‘चांद्रयान-२’ मोहिमेत ‘इस्रो’ने केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे व त्याने आम्हालाही स्फूर्ती मिळाली आहे. नासाने म्हटले की, आपण दोघे मिळून सौरमंडळाचा आणखी शोध घेण्याची संधी मिळेल, याची आम्हाला आतुरतेने प्रतिक्षा आहे.