Coronavirus : भारतातही ब्रिटनसारखी भयावह परिस्थिती?; पाहा काय म्हणाले AIIMS चे प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:17 AM2021-04-01T09:17:33+5:302021-04-01T09:20:48+5:30
Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून भारतात होत आहे मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. देशात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. परंतु कोरोनाशी लढण्यासाठी अनेक पावलंही उचलली जात आहेत. दरम्यान, देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागील कारण म्हणजे नवा स्ट्रेन असल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली. ही परिस्थिती अगदी ब्रिटेनसारखी आहे. ख्रिसमसच्या दरम्यान ब्रिटनदेखील कोरोना विषाणूच्या म्युटेशनच्या प्रादुर्भावातून जात होता, असं त्यांनी नमूद केलं.
"होळीच्या दरम्यान देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसली. कारण तशीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळत आहे. असंही होऊ शकतं की असा कोणतं म्युटेशन असेल जे विषाणूपेक्षा अधिक संसर्ग पसरवणारा असू शकतो. डेटा नाही याचा अर्थ असा नाही की याचे पुरावेच नाहीत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही म्युटेशनशीच संबंधित आहे," असं गुलेरिया म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीमागे काहीतरी नक्कीच आहे जे त्या विषाणूला अधिक संसर्गजन्य बनवत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
लसीकरणासाठी रणनिती आवश्यक
आपल्याला अशी रणनिती तयार करण्याची गरज आहे ज्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांचं लसीकरण करू शकू. परंतु अश स्थितीत आपल्याला लसीच्या प्रत्येक प्रतिकूल प्रभावावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंही गुलेरिया म्हणाले. "सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक अशा लसींचं उत्पादन करण्यावर विचार करत आहेत ज्या लहान मुलांनाही देता येतील. जर महासाथीला आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर अशा लसींचीही आपल्याला गरज आहे ज्या लहान मुलांना देता येतील. त्याचवेळी आपण त्यांना शाळेत पाठवू शकू," असंही त्यांनी स्पष्ट केलं.