त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या सर्व शक्यता पडताळून पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:04 IST2021-11-19T15:04:17+5:302021-11-19T15:04:50+5:30
सर्वाेच्च न्यायालयाचे मुंबई आयआयटीला निर्देश

त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या सर्व शक्यता पडताळून पाहा
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तांत्रिक अडचणीमुळे क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरता न आल्यामुळे मुंबईच्या आयआयटीमध्ये प्रवेश नाकारलेल्या दलित विद्यार्थ्याला सर्वाेच्च न्यायालयाने आधार दिला आहे. काेणास ठावूक, हा मुलगा भविष्यात देशाचे नेतृत्व करेल?, असे मत नाेंदवून न्यायालयाने त्याला प्रवेश देण्यासाठी ३ दिवसांत सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले.
प्रिंस जयबीर सिंह या विद्यार्थ्याला आरक्षित प्रवर्गात ८६४ वा क्रमांक मिळाला हाेता. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने सांगितले, की त्याची काहीही चूक नसताना त्याला प्रवेश घेता आलेला नाही. किती मुलांना आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते? काेणास ठावूक, हा मुलगा देशाचे नेतृत्व करेल? कायद्यातील मुद्द्यांकडे बाेट दाखवून आपण त्याला उच्च न्यायालयाप्रमाणे दार दाखवू शकताे. मात्र, मानवतेच्या दृष्टिकाेनातून न्यायालयाने कधीकधी कायद्याच्या पलीकडे जायला हवे.
काय आहे प्रकरण ?
प्रिंंस याला आयआयटी मुंबईमध्ये सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये संधी मिळाली हाेती. मात्र, २७ ऑक्टाेबरला क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट जमा करता आले नाही. बराच प्रयत्न करूनही त्याला अपयश आले. याबाबत त्याने आयआयटीच्या व्यवस्थापनाला अनेक ई-मेल पाठविले आणि काॅल्सही केले. मात्र, त्याला काेणताही प्रतिसाद मिळाला नाही.