गोव्यात आयबीस स्टाईल्स हॉटेलचे शानदार उद्घाटन
By Admin | Published: September 21, 2016 07:14 AM2016-09-21T07:14:44+5:302016-09-27T01:08:07+5:30
अकॉर हॉटेल आणि इंटरग्लोब हॉटेल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्याच आयबीस स्टाईल्स या हॉटेलचे गोव्यात मोठ्या थाटामाटात मंगळवारी उद्घाटन झाले.
ऑनलाइन लोकमत
कळंगुट, दि. 20 - अकॉर हॉटेल आणि इंटरग्लोब हॉटेल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्याच आयबीस स्टाईल्स या हॉटेलचे गोव्यात मोठ्या थाटामाटात मंगळवारी उद्घाटन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते या अत्याधुनिक हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, अकॉर हॉटेलचे भारतातील वरिष्ठ उपाध्यक्ष जॉ. मिशेल कॅसे, इंटरग्लोब हॉटेलचे अध्यक्ष आणि सीईओ जे. बी. सिंग, आयबीस स्टाईल्स हॉटेलचे व्यवस्थापक निखिल शिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि पर्यटक या उद्घाटन समारंभावेळी उपस्थित होते.
गोवा हे भारतातील सर्वात महत्वाचे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून याठिकाणी आल्यावर आपल्याला आयुष्यातील वेगळा अनुभव पाहायला मिळेल. आयबीस हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला युनिक डिझाइन केलेल्या अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल. याचबरोबर हे हॉटेल फॅमिलीसाठी, खासकरून विश्रांती घेण्यासाठी आणि फ्रेंड्स सर्कलसाठी बनविण्यात आले असल्याचे अकॉर हॉटेलचे भारतातील वरिष्ठ उपाध्यक्ष जॉ. मिशेल कॅसे यांनी सांगितले. तर इंटरग्लोब हॉटेलचे अध्यक्ष आणि सीईओ जे. बी. सिंग यांनी सांगितले की, आम्ही आयबीस स्टाईल्सची पार्टनरशिप केल्यामुळे खूश आहोत. गोवा हे पर्यटकांबरोबरच हॉटेल व्यवसायासाठी महत्त्वाचे ठिकाण असून, येथे उत्तम दर्जाची प्रेक्षणीय स्थळे आहेत.
तर, पर्यटकांना चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर आयबीआयएस स्टाईल्स हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, फॅमिली, फ्रेंड्स आणि कार्पोरेट कंपन्याच्या बिझिनेस मिटिंगची येथे सोय केली आहे. हॉटेलच्या ओपनिंगमुळे आम्ही पर्यटकांसाठी काही ऑफर सुद्धा चालू केल्या आहेत, असे आयबीस स्टाईल्स हॉटेलचे व्यवस्थापक निखिल शिरोडकर यांनी सांगितले.
गोव्यातील पर्यटन वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटकांना ऑनलाइन व्हिसा देण्यास सुरुवात करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणखी नवे पर्यटनविषयी धोरण तयार करण्यात येत असल्याची माहितीही गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी यावेळी दिली.
गोव्यातील कळंगुट परिसरात आयबीस स्टाईल्स हॉटेल असून या ठिकाणाहून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर येथील लोकप्रिय असलेला तिवई बीच आणि कळंगुट बीच आहे. आयबीआयएस स्टाईल्स हॉटेलमध्ये 197 खोल्या आहेत. जागतिक दर्जाच्या या हॉटेलमध्ये पर्यटकांना आणि प्रवाशांना उत्तम सेवा दिली जाणार आहे.
तसेच अत्याधुनिक सुविधा असलेल्या या हॉटेलमध्ये स्क्रीन टीव्ही, वाय-फाय, स्विमिंग पूल, जीम, किड्स प्ले ग्राऊंड, स्पाइस इट रेस्टॉरन्ट, बिझनेस हॉल, लॉबी हॉल आणि कॉन्फरन्स हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर चारचाकी आणि दुचाकी वाहने ठेवता येतील, अशी पार्किंगची सोय तळघरात करण्यात आली आहे.
गोव्यातील आयबीस स्टाईल्स हे भारतातील पहिले हॉटेल असून अॅडव्हान्स दर्जाचे आहे. येत्या वर्षभरात आयबीसची आणखी काही हॉटेल्स भारतात उभारण्याचा मानस आहे. जगभरात अनेक ठिकाणी आयबीस स्टाईल्सची हॉटेल्स आहेत.