यू आर बॉम्बर! तरुण-तरुणीच्या ‘चॅटिंग’मुळे खळबळ, मुंबईला येणारे विमान ६ तास ‘लटकले’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 05:46 AM2022-08-17T05:46:01+5:302022-08-17T06:59:11+5:30
flight : ही घटना रविवारी, १४ ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीच्या विमानात घडली. एक मुलगा मंगळुरूहून मुंबईला निघाला होता. तो त्याच्या मैत्रिणीशी फोनवर ‘चॅटिंग’ करत होता.
मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुण आणि तरुणीच्या ‘व्हॉट्सॲप चॅटिंग’मुळे खळबळ उडाली. यामुळे मुंबईला येणाऱ्या विमानाला तब्बल सहा तास उशीर झाला. एवढेच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरावे लागले आणि सखोल तपासणीनंतरच त्यांना विमानात प्रवेश मिळाला.
ही घटना रविवारी, १४ ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीच्या विमानात घडली. एक मुलगा मंगळुरूहून मुंबईला निघाला होता. तो त्याच्या मैत्रिणीशी फोनवर ‘चॅटिंग’ करत होता. मुलगी त्या मुलाला ‘तू बॉम्बर आहेस’ असा मेसेज पाठवते. पण, त्याच्या बाजूला बसलेल्या महिला प्रवाशाची अचानक या मेसेजवर नजर पडते आणि नंतर एकच गोंधळ उडतो.
अलर्टनंतर विमान माघारी
ती महिला प्रवासी तातडीने विमानातील क्रू मेंबर्सना संशयास्पद मेसेजबाबत माहिती देते. लगेच पायलटलाही याबाबत कल्पना दिली जाते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर पोहचणार होते, त्याचवेळी पायलट हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देतो आणि तातडीने विमानाला माघारी वळवले जाते.
दोघांचीही चौकशी
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलगा आणि मुलगी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. मुलगा मंगळुरूहून मुंबईला तर मुलगी बंगळुरूला निघाले होते. चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. दोघे गमतीने बोलत असल्याचे समोर आले. दोघेही मित्र असून आपापसात सुरक्षेबद्दल मस्करी करत होते. शहर पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी ही घटना दोन मित्रांमधील व्हॉट्सॲपवर वैयक्तिक चॅटिंगची होती, असे सांगितले. सुरक्षेबाबत दोन मित्रांमध्ये मैत्रीपूर्ण संभाषण होते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचेही शशी कुमार म्हणाले.
६ तासांनंतर उड्डाण
दरम्यान, विमान माघारी आल्यानंतर प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रवासी पुन्हा चढले आणि १८५ प्रवाशांसह संध्याकाळी ५ वाजता विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले. पण, उडालेला गोंधळ आणि नंतरची चौकशी यामुळे तरुणाला त्या विमानातून प्रवास करता आला नाही. तर, तरुणीचेही विमान ‘मिस’ झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडल्यामुळे विमानतळावर मात्र चांगलीच धावपळ उडाली.