Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 09:01 AM2024-05-12T09:01:41+5:302024-05-12T09:07:39+5:30
Make In India : २०१४ साली सुरु करण्यात आलेल्या मेक इन इंडिया योजनेच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती झाली याबद्दल पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं.
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून बेरोजगारी, उद्योगधंद्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. सरकारने गेल्या १० वर्षात रोजगाराचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेलं नाही म्हणत विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लोकमत समूहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलते केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया योजनांच्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.
मोदी सरकारने सप्टेंबर २०१४ मध्ये मेक इन इंडिया मोहीम सुरू केली होती. या मोहिमेचे उद्दिष्ट गुंतवणूक आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे, कौशल्य विकासात सुधारणा करणे, बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन पायाभूत सुविधा निर्माण करणे हे होते. याशिवाय सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यातून सुधारणांच्या आघाडीवर अनेक महत्त्वाची पावले उचलली होती. मात्र विरोधकांकडून गेल्या १० वर्षात किती तरुणांना रोजगार मिळाला असा सवाल विचारला जातोय. यासोबत मोदी सरकारने सुरु केलेल्या मेक इन इंडियासारख्या योजनांचा किती फायदा झाला असाही प्रश्न विचारला जातो. त्यावर आता पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडिया योजनेच्या यशाबाबत भाष्य केलं आहे.
मेक इन इंडिया देशाला किती फायदा झाला?
"रोजगार निर्मिती आणि विकास या दोन्ही मुद्द्यांतील वस्तुस्थिती तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या प्रमुख माध्यम समूहाने समजून घेतली, याचा मला विशेष आनंद आहे. जेव्हा आम्ही रोजगार, नोकऱ्या यांच्याबद्दल बोलतो, त्यावेळी नेहमीच वस्तुनिष्ठ मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, उद्योजकता किंवा नव्याने निर्माण झालेली क्षेत्रे या सर्वांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी निश्चितपणे मिळाव्यात, यासाठी आम्ही बहुव्यापी रणनीती आखली आहे. उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांचेच पाहा. आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मी नियमितपणे रोजगार मेळावे घेतले आहेत. याद्वारे लाखो तरुणांना त्यांच्या नोकरीचे पत्र मिळाले आहे. खासगी क्षेत्रात उत्पादन क्षेत्र व स्टार्टअप यांचे प्रमाण लक्षणीय आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही या मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करत सरकारने आत्मनिर्भर भारत अशी मोहीम राबवली होती. मेक इन इंडियाबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काही तज्ञांचे म्हणणे आहे की हे खूप महत्वाकांक्षी आहे आणि मेक इन इंडिया मोहिमेला अजून गती मिळू शकलेली नाही. तसेच, भारत उत्पादनाऐवजी असेंबलिंगचे केंद्र बनत आहे.