माफ करा, सर्वांसमोर प्रायश्चित्त घेण्यास तयार; कोर्टाच्या अवमानाबद्दल पतंजलीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:19 AM2024-04-17T05:19:15+5:302024-04-17T05:20:32+5:30
उत्साहाच्या भरात झाले. यापुढे आम्ही लक्षात ठेवू, असे बाबा रामदेव म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आधुनिक चिकित्सा पद्धतींविरुद्ध प्रसिद्ध केलेल्या भ्रामक जाहिराती, तसेच ॲलोपॅथिक औषधांविरुद्ध वक्तव्य करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मंगळवारी पतंजली आयुर्वेदने एका आठवड्यात जाहीर माफी मागण्याची तयारी दर्शविली. न्यायालयाने पतंजलीची माफी स्वीकारलेली नसून, याप्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी ठेवली आहे.
कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठापुढे हजर होऊन पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि सहसंस्थापक योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्तिशः माफी मागितली. न्यायालयाला हमी देऊनही त्याचे उल्लंघन का केले, याविषयी विचारणा करताना न्यायमूर्तींद्वयांनी सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना चांगलेच फटकारले. आम्ही त्यावेळी जे केले ते करायला नको होते. ते उत्साहाच्या भरात झाले. यापुढे आम्ही लक्षात ठेवू, असे बाबा रामदेव म्हणाले.
हात जोडून म्हणाले...
न्यायमूर्ती कोहली रामदेव यांना म्हणाले, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची खूप प्रतिष्ठा आहे... लोक तुमच्याकडे बघतात, तुमच्या कामांची प्रशंसा करतात. तुम्ही योगासाठी खूप काम केले आहे. मात्र, तुम्ही आधुनिक चिकित्सा पद्धतीला चुकीचे ठरवू शकत नाही. तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही चांगले काम करत आहात. यावेळी रामदेव हात जोडून म्हणाले की, माझ्याकडून जी काही चूक झाली आहे, त्याबद्दल मी बिनशर्त माफी मागितली आहे.
तुम्ही मनापासून माफी मागत नाही...
बालकृष्ण यांनी रामदेव यांचा कंपनीच्या दैनंदिन व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचे सांगताच पीठाने नाराजी व्यक्त केली. न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह म्हणाले की, तुम्ही पुन्हा तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. तुम्ही मनापासून माफी मागितलेली दिसत नाही. त्यावर रोहतगी म्हणाले की, आम्ही सार्वजनिक माफी मागायला तयार आहोत. यामुळे आम्हाला लोकांसमोर पश्चात्ताप करता येईल. आम्ही न्यायालयाकडे दुर्लक्ष करत नाही.