बिआंतसिंग यांच्या मारेकऱ्याच्या फाशीचे रूपांतर जन्मठेपेमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:12 AM2019-11-13T04:12:07+5:302019-11-13T04:12:11+5:30
बब्बर खालसा या संघटनेचा दहशतवादी बलवंतसिंग राजोआना याला २००७ साली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर केंद्र सरकारने जन्मठेपेमध्ये केले आहे.
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिआंतसिंग यांची हत्या करणारा बब्बर खालसा या संघटनेचा दहशतवादी बलवंतसिंग राजोआना याला २००७ साली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर केंद्र सरकारने जन्मठेपेमध्ये केले आहे. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
पंजाब सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, हल्लेखोर बलवंतसिंग राजोआना (५२ वर्षे) हा पंजाबमधील पतियाळा कारागृहामध्ये असल्याने त्याच्या शिक्षेतील बदलाची माहिती केंद्र सरकारने आम्हालाही कळविली.
बिआंतसिंग यांची हत्या करणारा बलवंतसिंग पंजाबमधील माजी पोलीस कर्मचारी आहे. त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १ आॅगस्ट २००७ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेची ३१ मार्च २०१२ रोजी अंमलबजावणी होणार होती. त्याच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये घेतला होता.
>बॉम्बस्फोटातील गुन्हेगार : बलवंतसिंग राजोआना याची फाशीची शिक्षा माफ करावी, असा अर्ज शिरोमणी गुरुद्वारा प्रतिबंधक समितीने २८ मार्च २०१२ रोजी केंद्र सरकारकडे केला होता. चंदीगड येथील सचिवालयाच्या बाहेर ३१ आॅगस्ट १९९५ रोजी घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात मुख्यमंत्री बिआंतसिंग व अन्य १६ जण मरण पावले होते. या प्रकरणात दिलावरसिंग या पोलीस अधिकाºयाने सुसाईड बॉम्बरची भूमिका बजावली होती.