जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; शुल्कवाढीचा निर्णय मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 05:56 PM2019-11-13T17:56:42+5:302019-11-13T18:21:15+5:30
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शुल्कवाढीचा निर्णय प्रशासनाकडून मागे
नवी दिल्ली: वसतिगृहाच्या वाढीव शुल्काविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. विद्यापीठ प्रशासनानं शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यन यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. जेएनयूच्या प्रशासकीय समितीनं वसतिगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतल्याचं सुब्रमण्यन यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करुन पुन्हा वर्गांमध्ये जावं, असं आवाहन त्यांनी केलं.
विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यकारी समितीनं जेएनयूच्या बाहेर बैठक घेतली. मात्र बैठकीचं ठिकाण बदलल्याची कोणतीही माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, असा आक्षेप जेनएयूच्या शिक्षण संघटनेनं घेतला. आयटीओच्या जवळ असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजमध्ये जेएनयूच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली.
आमचे अनेक मुद्दे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचं जेएनयूटीएचे अध्यक्ष डी. के. लोबियाल यांनी म्हटलं. 'पदोन्नतीसारखे विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हाला ते मांडायचे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून शैक्षणिक कार्यकारी समितीची बैठक एक तर रद्द केली जाते किंवा दुसऱ्या ठिकाणी तिचं आयोजन केलं जातं. आम्ही याचा निषेध करतो. कुलगुरु अशा प्रकारे विद्यापीठ चालवू शकत नाहीत,' असं लोबियाल म्हणाले.