इच्छाशक्तीअभावी निवडणूक सुधारणा दीर्घकाळ प्रलंबित, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:00 AM2019-02-04T06:00:31+5:302019-02-04T06:01:26+5:30
प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.
नवी दिल्ली : प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.
देशातील निवडणूक यंत्रणा व लोकशाही राजवटीचा अभ्यास करून काही विश्लेषक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सनदी अधिकारी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन व संपादन कुरेशी यांनी केले आहे. या लेखांचे ‘दी ग्रेट मार्च आॅफ डेमॉक्रसी : सेव्हन डिकेड्स आॅफ इंडियाज इलेक्शन' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. देशातील पहिली लोकसभा निवडणूक, आयोगाचे कार्य तसेच आजवर झालेल्या निवडणुकांचा आढावा या पुस्तकात आहे.
मनोगतात कुरेशी यांनी म्हटले आहे की, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यास अटकाव करणे, निवडणूक आयोगातील नियुक्त्या पारदर्शीपणे होण्यासाठी तसे कायदे करणे, निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणे या गोष्टी अंमलात येणे आवश्यक आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनेक पत्रे लिहिली. पण अद्याप या सुधारणा होऊ शकलेल्या नाहीत. लोकशाहीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावणाºया न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळेच काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणा अमलात आल्या हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पैशांचा गैरवापर थांबवा
माजी राष्ट्रपती व भारतरत्न प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला पैशाचा व बळाचा गैरवापर ही चिंताजनक बाब आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास लोकशाही आपला आत्मा हरवून बसेल.