कामकाजावर बहिष्कार सुरूच
By admin | Published: August 7, 2015 10:16 PM2015-08-07T22:16:31+5:302015-08-07T22:16:31+5:30
काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाविरोधात बहुतांश विरोधी पक्षांनी शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही एकी दाखवत लोकसभेच्या कामकाजावर
नवी दिल्ली : काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाविरोधात बहुतांश विरोधी पक्षांनी शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही एकी दाखवत लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तर समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांनी सभात्याग केला.
सकाळी लोकसभेचे कामकाज झाले तेव्हा काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. कामकाज सुरू होताच सपा सदस्यांनी काँग्रेस खासदारांच्या निलंबनाविरोधात घोषणाबाजी सुरूकेली. डावे पक्षही यात सहभागी झाले. प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा लावून धरण्याची मागणी या सदस्यांनी केली; मात्र लोकसभाध्यक्षांनी परवानगी नाकारली. यामुळे सपा, राजद व डाव्यांनी सभात्याग केला.
राज्यसभेतही निलंबनाच्या विरोधात काँग्रेस सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. यामुळे प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहराचे कामकाज होऊ शकले नाही. दोन वेळेच्या स्थगितीनंतरही काँग्रेस सदस्यांचा गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे अखेर २.४५ वाजता सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)