पाकव्याप्त काश्मीरमधील स्मारकांच्या छायाचित्रांचे दिल्लीत प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:01 AM2019-09-19T06:01:24+5:302019-09-19T06:01:34+5:30
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चर्चा होत असतानाच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीरमधील स्मारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिल्लीत आयोजित केले
- नितीन नायगावकर
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चर्चा होत असतानाच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीरमधील स्मारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिल्लीत आयोजित केले असून, यात शिवमंदिर, रामकोट किल्ल्यासारखी स्थळे भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधत आहेत.
पाकव्याप्त काश्मीर हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. तेथील संस्कृती, परंपरा, स्मारके आदींचा प्रत्यक्ष अनुभव मोजक्या लोकांच्या वाट्याला आला. मात्र, पुरातत्व विभागाने भारताचा दीडशे वर्षांचा इतिहास जतन करून ठेवला आहे. यात पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदू मंदिरे, आकर्षक किल्ले, ऐतिहासिक स्थळांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या कलादालनात हे प्रदर्शन सुरू असून, त्याचा गुरुवारी समारोप होईल. गिलगीट-बाल्टिस्तान येथे भव्य खडकावर कोरलेली बुद्धाची प्रतिमा, एका खडकावर कोरलेले हिंदू देवी-देवतांचे शिल्प विशेष लक्ष वेधून घेतात. गाखर समुदायाच्या सुलतान मुजफ्फर खान याच्या काळात १६ व्या शतकात मुजफ्फराबाद येथे लाल किल्ला बांधण्यात आला. रामकोट किल्ला नावाने तो ओळखला
जातो.
दोन्ही मंदिरे भग्नावस्थेत
महाराजा गुलाब सिंह यांनी मीरपूर खासमध्ये रघुनाथ मंदिर उभारले होते, १७ व्या शतकात याच मीरपूरमध्ये शिवमंदिर बांधण्यात आले होते. या दोन्ही मंदिरांची भग्नावस्थेतील छायाचित्रे इथे आहेत. अलेक्झांडर व पोरस यांच्यातील सर्वाधिक गाजलेले युद्ध याच मीरपूर खासमध्ये झाले होते. मीरपूरमध्ये पूर्वी केवळ हिंदू राहायचे.
फाळणीपूर्वीचा इतिहास
फाळणीपूर्वीच्या भारताची पुरातत्वीय संस्कृती व इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आपल्या वैभवशाली इतिहासाबाबत लोकांमध्ये जागरूकता असावी, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
-नवनीत सोनी,
सदस्य सचिव,
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण