'सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 12:12 PM2018-04-12T12:12:45+5:302018-04-12T12:12:45+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहिलं आहे. कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्तीला उशीर होत असल्याबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात असल्याचं जोसेफ यांनी मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
'कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे,' असं न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीत होत असल्याबद्दल विलंबाबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात कोणतंही पाऊल न उचलल्यास इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही,' असं जोसेफ यांनी पत्रात म्हटलं आहे.
वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस कॉलेजियमनं फेब्रुवारीत केली होती. मात्र या शिफारसींचं अद्याप काहीही झालेलं नाही. त्यामुळेच न्यायाधीश जोसेफ यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. 'कॉलेजियमच्या शिफारसीला तीन महिने होऊन गेलेत. मात्र अद्याप न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे,' असं जोसेफ यांनी पत्रात म्हटलं आहे.