Exit Poll 2022: पाचपैकी तीन राज्यांत भाजपा, तर पंजाबमध्ये आप मुसंडी मारणार, तर गोव्यात त्रिशंकू चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:18 PM2022-03-07T21:18:42+5:302022-03-07T21:19:25+5:30
Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामधील बहुतांश एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल असा कल वर्तवण्यात आला आहे. तर मणिपूरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. मात्र उत्तराखंड आणि गोवा या राज्यांसाठी विविध एक्झिट पोलमधून वेगवेगळा कल दर्शवण्यात आला आहे. दरम्यान, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार पाच पैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये तीन राज्यांत भाजपाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर पंजापमध्ये आपला बहुमत मिळू शकते. तर गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरेल, मात्र तिथेही त्रिशंकू विधानसभेची शक्यता आहे.
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पेकी २८८-३२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ७१ ते १०१ जागा मिळू शकतात. बहुजन समाज पक्षाला ३ ते ९ जागा मिळू शकतात तर इतरांना ३ ते ६ जागा मिळू शकतात.
तर या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्येही भाजपा सत्ता राखण्याची शक्यता आहे. येथे भाजपाला ३६ ते ४६, काँग्रेसला २० ते ३०. आपला शून्य तर इतरांना ४ ते ९ जागा मिळू शकतात.
पंजाबमध्ये या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्ष प्रचंड बहुमतासह सत्तेत येण्याची शक्यता आहे. आपला पंजाबमध्ये ७६ ते ९० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १९ ते ३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांची निराशा होण्याची शक्यता आहे.
मणिपूरमध्येही भाजपाची सत्ता कायम राहण्याची शक्यता या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाला साठ पैकी ३३ ते ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ४ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला १४ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. मगोपला २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. आपलाही २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.