एक्झिट पोलचे भाकीत; गुजरातमध्ये मोदींचा करिष्मा कायम, ‘आप’ तळात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 08:00 AM2022-12-06T08:00:02+5:302022-12-06T08:00:29+5:30
भाजप राखणार गड, काँग्रेस दुसऱ्या स्थानी, हिमाचलमध्ये सत्तेसाठी टसल
नवी दिल्ली : गुजरातमध्ये भाजप हा काँग्रेस, आपचा धुव्वा उडवून पुन्हा सत्ता काबीज करणार असल्याचा निष्कर्ष विविध एक्झिट पोलमधून काढण्यात आला आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा काँग्रेस जिंकणार असून, आप पक्षाचा दारुण पराभव होणार असल्याचे चित्र यातून उभे राहिले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्ता कायम राखण्यात यश मिळणार असले तरी तिथे काठावरचे बहुमत मिळेल, असे भाकीत वर्तविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजप सातव्यांदा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज पोल चाचण्यांनी वर्तविला आहे.
हिमाचलमध्ये सत्ता राखण्यात यश?
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ३७ जागांवर विजय मिळविण्याची शक्यता आहे, असा बहुतांश एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. त्याखालोखाल काँग्रेसला सर्वाधिक ३० जागा मिळतील. आपचा या राज्यात दणदणीत पराभव होण्याची शक्यता आहे.
भाजपला सरासरी १०० जागा
गुजरातमध्ये भाजपला किमान ८१ ते कमाल १५१, काँग्रेस व मित्रपक्षांना किमान १६ व कमाल ५१ जागा मिळतील, असे भाकीत आहे. २०१७ मध्ये भाजपला ९९ व काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. यंदाच्या भाजप सरासरी १०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचे व काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घट होणार असल्याचे म्हटले आहे.
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५८.८ टक्के मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका तसेच पाच राज्यांतील सहा विधानसभा जागा, लोकसभेची एक जागा यासाठी झालेल्या पोटनिवडणुका यांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येतील.
‘आप’चा प्रभाव नाही : ‘आप’ला गुजरातमध्ये १० पेक्षा कमी व हिमाचल प्रदेशमध्ये एकही जागा मिळणार नाही, अशी शक्यता असल्याचे एक्झिट पोलच्या निष्कर्षात वर्तविण्यात आली आहे.