‘एक्झिट पोल’ने साधला समतोल! पश्चिम बंगालमध्ये मात्र अंदाज चुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 05:54 AM2021-05-03T05:54:30+5:302021-05-03T05:55:01+5:30
बहुतांश निष्कर्ष ठरले खरे, पश्चिम बंगालमध्ये मात्र अंदाज चुकला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपताच जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये (एक्झिट पोल) अनेकांनी भाजपला आसामात सत्ता राखता येईल, असे सांगतानाच इतरत्र हा पक्ष मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवला होता. बंगालमध्ये तर भाजपला १०० हून अधिक जागा मिळून सत्तेच्या समीप हा पक्ष जाईल, असेही भाकीत करण्यात आले होते. परंतु निकालात भाजपला ७५ जागांवरच समाधान मानावे लागले.
कोरोनाचे सावट देशावर अधिक गडद झाले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुकलीने बंगाल निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. भाजपचा प्रचाराचा झंझावात आणि मोदी-शहा यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून झाडून साऱ्या सर्वेक्षण संस्थांनी निष्कर्षांत बंगालात भाजप १०० हून अधिक जागा पटकावेल, असा अंदाज व्यक्त केला होता.
तामिळनाडूत सत्तेचा लंबक कधी अण्णाद्रमुक तर कधी द्रमुककडे झुकतो. यावेळी जनतेने पसंती द्रमुकला दिली. तामिळनाडूत पाच वर्षांनी सत्तापालट होतो. एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत इथे ठरले. भाजपचे अण्णाद्रमुकशी युती करून दक्षिणेत चंचूप्रवेश करण्याचे स्वप्न पुन्हा भंगले.
मल्याळी जनतेने मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. केरळात सत्तापालट होणार नाही. माकपप्रणीत एलडीएफ पुन्हा विजयी होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या कारभारावर आसामी जनता खूश असून, त्यांच्याचकडे पुन्हा एकदा सत्तेची दोरी आसामी जनतेने सोपवली आहे. आसामात भाजप सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला असला तरी काँग्रेसनेही चांगली लढत दिल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट होत आहे.
पुदुच्चेरीत एन. रंगास्वामी यांच्या स्थानिक काँग्रेस पक्षाशी भाजपने हातमिळवणी केली आहे. त्यात अण्णाद्रमुकचाही समावेश आहे. या आघाडीने पुदुच्चेरीत १५ जागांवर आघाडी घेत सत्तेसाठी दावा केला आहे. काँग्रेस व स्थानिक आघाडीत रस्सीखेच होईल, असा अंदाज पोलमध्ये वर्तविण्यात आला होता.
पश्चिम बंगालमध्ये लागलेल्या निवडणूक प्रत्यक्ष निकालात भाजपला ७५ जागांवरच विजय नोंदवता आला असून, ममतांच्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.