एक्झिट पोलने दिले संकेत, ‘फिर एक बार मोदी सरकार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:06 AM2019-05-20T06:06:24+5:302019-05-20T06:06:34+5:30
गेल्या लोकसभेत : ‘रालोआ’ने ५४३पैकी ३४१ जागा जिंकल्या होत्या
नवी दिल्ली : १७व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर जनमत चाचण्यांमच्या (एक्झिट पोल) अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. ‘एक्झिट पोल’चे अंदाज बहुतेक वेळा सपशेल चुकतात, हा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, भारतीय मतदारांनी वास्तवात दिलेला कौल काय आहे, हे येत्या गुरुवारी २३ मे रोजी होणाऱ्या मतमाजणीनंतरच स्पष्ट होईल.
सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सायंकाळी संपताच विविध वृत्तवाहिन्या, माध्यमे व सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जाहीर झाले. यामध्ये विविध पक्ष वा आघाड्यांना मिळणाºया संभाव्य जागांच्या संख्येमध्ये मोठी तफावत असली, तरी दोन बाबतींत त्यांच्यात एकमत होते. एक म्हणजे त्रिशंकू लोकसभेची अवस्था न येता ‘रालोआ’ स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येईल. दुसरे म्हणजे ‘रालोआ’ व त्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या जनाधारास पाच ओहोटी लागली आहे. मात्र, मतदारांमधील ही नाराजी ‘रालोआ’ला सत्तेवरून खाली खेचण्याएवढी मतांमध्ये परिवर्तित करण्यात विरोधी पक्षांना यश आलेले नाही.
ही राज्ये देणार मोदी यांना साथ
- मध्य प्रदेश : भाजप २६ ते २८, काँग्रेस १ ते ३ जागा
- कर्नाटक : भाजप २१ ते २५, काँग्रेस ३ ते ६ जागा
- बिहार : भाजप+ ३८ ते ४०, काँग्रेस, राजद ० ते २, अन्य ०
- महाराष्ट्र : भाजप व शिवसेना ३४ ते ४२, काँग्रेस ६ ते १०,
- गुजरात : भाजप २५ ते २६, काँग्रेस १ जागा
- राजस्थान : भाजप २३ ते २५, काँग्रेस ० ते २ जागा
- हरियाणा : भाजप ८ ते १० जागा, काँग्रेस ० ते २
- दिल्ली : भाजप ६ ते ७, आप ०, काँग्रेस ० ते १ जागा
- उत्तर प्रदेश : सन २०१४ च्या निवडणुकीत ८० पैकी ७६ जागा भाजपच्या झोळीत टाकल्या होत्या, पण या वेळी उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसून २५ ते ४० जागा गमवाव्या लागतील, असा अंदाज.
- प. बंगाल : ममता बॅनर्जी यांच्या या राज्यात भाजप मुसंडी मारून १५ ते २२ जागा जिंकेल, असे ही सर्वेक्षणे दाखवितात.
जाणून घ्या... कोणता पक्ष कोणाच्या बाजूने ?
एनडीए । भाजप, शिवसेना, जनता दल युनाइटेड, लोक जनशक्ती पार्टी, अकाली दल, अपना दल (एस)
यूपीए । काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय लोकसमता पार्टी, हिंदुस्तान आवाम मोर्चा, लोकतांत्रिक जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (सेक्युलर), डावे पक्ष, डीएमके, केरल काँग्रेस (जेकब)
इतर । तृणमूल कांग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी+बहुजन समाज पार्टी, तेलंगाना राष्ट्र समिती, नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, बीजेडी