पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:49 PM2018-02-03T23:49:19+5:302018-02-03T23:49:33+5:30
विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.
भोपाळ : विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.
मध्य प्रदेशमध्ये २00३ पासून भाजपाचे सरकार असून, २00५ स्पासून शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. गुजरात निवडणुका मिळालेला निसटता विजय आणि राजस्थानात पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव यामुळे राज्यात नाराज आमदारांनी नवे प्रश्न निर्माण करू नयेत, यासाठी तीन जणांना मंत्री केल्याचे सांगण्यात येते.
बाळकृष्ण पाटीदार, जलम सिंग पटेल व नारायण सिंह कुशवाह अशी तीन मंत्र्यांची नावे आहेत. जलम सिंग पटेल हे माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचे बंधू असून, ते लोधी समाजाचे आहेत. बाळकृष्ण पाटीदार हे पटेल (पाटीदार) समाजाचे आहेत. गुजरातप्रमाणे मध्य प्रदेशच्या बºयाच मतदारसंघांत पाटीदार समाज मोठ्या प्रमाणात असल्याने बाळकृष्ण पाटीदार यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. नारायण सिंह कुशवाह हे कच्छी समाजाचे आहेत.
या विस्तारात दलित समाजाचे गोपीलाल जाटव यांचाही समावेश होणार होता. ते जेथून निवडून आले, तेथे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तेथे आचारसंहिता लागू झाली असल्याने तेथील व्यक्तीला मंत्री करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळेच जाटव यांना मंत्री करण्यात आले नाही. शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिमंडळात आणखी काही जणांना घेणे शक्य आहे. (वृत्तसंस्था)