वाढवण बंदरामुळे आता जेएनपीटीची क्षमता वाढेल - जहाज बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:27 AM2020-08-26T02:27:54+5:302020-08-26T02:28:01+5:30
कोरोनात मजुरांना आपापल्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अशीच स्थिती मालवाहू जहाजांवरही होती, असे नमूद करून मांडविया म्हणाले
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : वाढवण बंदरामुळे जेएनपीटीवरील भार कमी होईल. त्याचा आर्थिक लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेएनपीटीची वाहतूक क्षमता १० मिलिअन टीईयूने वाढेल, असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी देशातील जहाजबांधणी उद्योगाचा आढावा घेतला. कोरोनामुळे जहाजांवर अडकून पडलेल्या क्रू मेंबर्सना परत आणण्यासाठी राबवलेल्या सर्वात मोठ्या अभियानाची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र जहाजबांधणी मंत्रालयासाठी महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे वाढवण पोर्ट आमच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे नमूद करून ते म्हणाले, तब्बल ९ लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून उभे राहणाऱ्या या बंदरामुळे डहाणू-पालघरसारख्या भागाचाही विकास होईल.
६५ हजार ५४५ कोटी
वाढवण पोर्टच्या उभारणीसाठी सुमारे ६५ हजार ५४५ कोटी रुपये खर्च होतील. त्यातील १४ हजार ५०० रुपये जीएसटी असेल. देशात सध्या जेएनपीटी, मडगाव, न्यू मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता हे प्रमुख पोर्ट (बंदरे) आहेत.
जहाज वाहतुकीस चालना मिळेल. जेएनपीटी बंदरावर मोठ्या प्रमाणावर मालवाहू जहाजे येतात. वाढवण पोर्ट उभे राहिल्यास हा भार कमी होईल. आमच्या अंदाजाप्रमाणे वाढवण पोर्टमुळे जेएनपीटी क्लस्टरची क्षमता जगात वाढेल. जगातील सर्वाधिक कंटेनर वाहतूक होणाºया पहिल्या दहा पोर्टच्या यादीत जेएनपीटीचा समावेश होईल.
कोरोनात मजुरांना आपापल्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अशीच स्थिती मालवाहू जहाजांवरही होती, असे नमूद करून मांडविया म्हणाले, आतापर्यंत १ लाख कर्मचाऱ्यांना (क्रू मेंबर्स) चार्टर्ड विमाने, जहाजांवरून नेण्याची जहाजबांधणी मंत्रालयाने केली.