‘टीम मोदी’चा विस्तार!
By Admin | Published: July 6, 2016 03:41 AM2016-07-06T03:41:22+5:302016-07-06T11:21:57+5:30
मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल व दुसऱ्या विस्ताराच्या प्रक्रियेत १0 राज्यांमधील १९ नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले तर ५ विद्यमान मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. राष्ट्रपती भवनाच्या अशोका
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
मोदी मंत्रिमंडळातील फेरबदल व दुसऱ्या विस्ताराच्या प्रक्रियेत १0 राज्यांमधील १९ नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले तर ५ विद्यमान मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात या १९ जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि सध्या राज्यमंत्री असलेले प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
त्याचबरोबर रामशंकर कथेरिया, निहालचंद, सांवरलाल जाट, मनसुखभाई वसावा, एम.के. कुंडारिया या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळाला आहे. पर्यावरण व वन विभागाचा स्वतंत्र प्रभार सांभाळणारे प्रकाश जावडेकर हे बढती मिळालेले एकमेव आहेत. त्यांना पूर्ण दर्जाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे डॉ. सुभाष भामरे व रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले या दोघांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आहे. एनडीएमधील रामदास आठवले (रिपब्लिकन) व अनुप्रिया पटेल (अपना दल) हे दोन राज्यमंत्री वगळता १७ राज्यमंत्री भाजपचेच आहेत. कॅबिनेट विस्तारापूर्वी शिवसेनेने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र शिवसेनेचे मंत्री अनंत गीते उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मंडळी या विस्तारात मंत्रीमंडळात असून एम. जे. अकबर (ज्येष्ठ पत्रकार) डॉ. सुभाष भामरे (सर्जन), अर्जुनराम मेघवाल (माजी नोकरशहा), अनिल दवे, फग्गनसिंग कुलस्ते व जसवंतसिंग भाभोर, रामदास आठवले, अजय टम्टा, रमेश जिगजिनगी व कृष्णा राज, एस. एस. अहलुवालिया (अल्पसंख्यांक समुदाय) अनुप्रिया पटेल, सी. आर चौधरी, पी. पी. चौधरी, मनसुखभाई मांडविया, महेंद्र पांडे, पुरुषोत्तम रुपाला, राजन गोहेन, विजय गोयल अशी त्यांची वर्गवारी आहे.
फेरबदलात महाराष्ट्राला काय?।
प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास खाते, डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्रीपद
तर रामदास आठवले यांना सामाजिक न्याय व सबलीकरण खात्याचे राज्यमंत्रीपद आले आहे.
यादी निश्चितीमध्ये संघही सहभागी...
नव्या मंत्र्यांची निवड विस्तृत विचार-विनिमयानंतर केली असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.
या भेटीनंतर शाह रा.स्व. संघाच्या कार्यालयात गेले आणि मंत्रिमंडळाच्या नव्या यादीबाबत संघ नेत्यांशी चर्चा करून यादी निश्चित केली.
मंगळवारी ज्यांचा शपथविधी झाला, त्या सर्वांनी सोमवारी पक्षाध्यक्ष अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
महत्त्वाचे बदल...
अरुण जेटली यांच्याकडे माहिती व प्रसारण या जादा खात्याचा कार्यभार होता. ते खाते आता वेंकय्या नायडू यांना देताना, त्यांच्याकडील नगरविकास खाते कायम ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांचे संसदीय कार्य खाते अनंतकुमार यांना मिळाले आहे.
अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते हे खातेही असेल.
स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास खाते प्रकाश जावडेकर यांना दिले असून, इराणी या आता वस्त्रोद्योग हे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते दिलेले आहे.
सदानंद गौडा यांच्याकडून कायदा खाते काढून घेण्यात आले असून, त्यांनाही कमी महत्त्वाचे सांख्यिकी व योजना अमलबजावणी खाते दिले आहे. माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
या पाच राज्यमंत्र्यांना का काढले?
1)रामशंकर कथेरिया : संसदेत आणि बाहेर केलेली वादग्रस्त वक्तव्ये
2)निहालचंद : बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप
3)संवरलाल जाट : संसदेतील गैरहजेरी आणि अकार्यक्षमता
4)मोहनभाई कुंडेरिया : योगा कार्यक्रमात लहान मुलांच्या अंगावरून चालत असल्याची चित्रफीत
5)मनसुखभाई वसावा : अकार्यक्षमता