केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग माेकळा, पाच ते सहा मंत्र्यांना वगळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:43 AM2021-07-07T06:43:43+5:302021-07-07T06:44:06+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले.
हरिश गुप्ता -
नवी दिल्ली : माेदी सरकारच्या बहुप्रतिक्षित जंबाे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर माेकळा झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला दाेन किंवा तीन मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे, डाॅ. भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामाेर्तब झाले आहे. भाजपमध्ये दाखल
झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ७ जागा रिक्त हाेत्या. तसेच उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लाेकसभा निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येउ शकते.
सरसंघचालक माेहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात वक्तव्य केले हाेते. मंत्रिमंडळात इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले ज्याेतिरादित्य सिंदिया, रिटा बहुगुणा जाेशी, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांना तसेच युतीतील घटक पक्षांना स्थान देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच माेदी सरकारमधून काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला हाेता. त्यानंतर किमा ५-६ मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ कॅबिनेट मंत्र्यांना पक्ष कार्यासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सहकार्यासाठी पाठविण्यात येऊ शकते. तसेच किमान तीन राज्यमंत्र्यांनाही डच्चू दिला जाऊ शकताे. बिहारमधून मंत्रिमंडळात सदस्य घ्यायचे झाल्यास त्यांच्यासाठी स्थान निर्माण करावे लागू शकते. शेतकरी आंदाेलनाला हताळण्यासाठी जाट समुदायातील काही जणांना स्थान मिळण्याचीही दाट शक्यता आहे.
गाेयल वा जावडेकर राज्यसभेतील नेते?
- थावरचंद गेहलाेत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- गेहलाेत राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचे नेते हाेते. त्यांची राज्यसभेतील जागाही आता रिक्त झाली असून, भाजपचे राज्यसभेतील नेते म्हणून पीयूष गाेयल किंवा प्रकाश जावडेकर यांना संधी निर्माण मिळू शकेल.
- राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्यामुळे हे पद पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहे.