यूपी सरकारचे पाहुणचारावर नऊ कोटी खर्च
By admin | Published: September 1, 2016 04:21 AM2016-09-01T04:21:08+5:302016-09-01T04:21:08+5:30
मंत्र्यांनी त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांचा चहा, समोसे, गुलाबजाम आदी पदार्थांनी केलेल्या स्वागताचा खर्च उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीवर तब्बल नऊ कोटी रुपयांचा भार
लखनौ : मंत्र्यांनी त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांचा चहा, समोसे, गुलाबजाम आदी पदार्थांनी केलेल्या स्वागताचा खर्च उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीवर तब्बल नऊ कोटी रुपयांचा भार टाकणारा ठरला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गेल्या चार वर्षांतील कारकिर्दीत एवढी प्रचंड रक्कम खर्च झाली आहे. ही माहिती इतर कोणी नाही तर स्वत: अखिलेश यादव यांनी विधानसभेत दिली.
१५ मार्च २०१२ रोजी यादव मुख्यमंत्री बनले तेव्हापासून १५ मार्च २०१६ पर्यंत आठ कोटी ७८ लाख १२ हजार ४७४ कोटी रुपये आगत-स्वागतावर खर्च झाले आहेत. सर्वात जास्त रक्कम खर्च केली आहे ती समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)अरुण कुमार कोरी यांनी. त्यांनी २२ लाख ९३ हजार ८०० रुपये या चार वर्षांत खर्च केले. त्यानंतर नागरी विकास मंत्री मोहम्मद आझम खान यांनी २२ लाख ८६ हजार ६२० रुपये वापरले.
सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी या खर्चाचे समर्थन केले आहे. उपलब्ध माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपाल यादव यांनी मात्र पाहुणचारावर काहीही खर्च केलेला नाही. अखिलेश यादव म्हणाले की नियमांनुसार मंत्र्यांना पाहुणचारावर २,५०० रुपये व राज्याबाहेर त्यांना ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना तीन हजार रुपये रोज खर्च करता येतात.