Ladakh Standoff: ...म्हणून चीनच्या सैन्याने घेतली माघार; आंतरराष्ट्रीय तज्ञांनी सांगितले तीन प्रमुख कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 11:32 AM2020-06-04T11:32:55+5:302020-06-04T11:34:10+5:30
कोरोना व्हायरमुळे जगभरातील अनेक महत्वाचे देश चीनवर दबाव टाकत आहे.
नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य सीमेपासून काही अंतरावर मागे हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत.
५ मे रोजी चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीने (PLA)या भागात आक्रमक भूमिका घेतली होती. पण तीन-चार दिवसांपासून या भागात चिनी सैनिकांकडून कुठल्याही हालचाली होत नाहीए. ते शांत आहेत. ज्या भागात चिनी सैनिकांनी अतिक्रमण केले होते तिथूनही त्यांनी मागे हटण्यास सुरुवात केलीय, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र चीनने माघार घेण्यामागे तीन प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रकरणातील तज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर हटण्यामागे तीन प्रमुख कारण आहे. यामध्ये भारतीय सैनिकांनी दिलेलं चोख प्रत्युत्तर हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दूसरे कारण म्हणजे कोरोना व्हायरसमुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामुळे चीनमधील नागरिकांमध्ये बेरोजगारी व असंतोषाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांचे या सर्व प्रकरणातून दूसरीकडे लक्ष वेदण्यासाठी चीन सरकार राष्ट्रवादाचे कार्ड वापरत आहे. अमेरिकेमुळे तैवान आणि दक्षिण चीन समुद्रात काहीही करता येत नसल्याने चीनने भारताविरूद्ध दबाव वाढवायला सुरूवात केली असल्याचे कमर आगा यांनी सांगितले.
कमर आगा म्हणाले की, कोरोना व्हायरमुळे जगभरातील अनेक महत्वाचे देश चीनवर दबाव टाकत आहे. हे लडाखच्या गलवान खोऱ्यातील चीनच्या सैनिकांनी माघार घेण्याचे तीसरं कारण आहे. दक्षिण चीन समुद्र, कोरोना आणि व्यापाराच्या बाबतीत चीन अमेरिकेबरोबर युद्ध करीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सामर्थ्यशाली देशांच्या गट -7 चा समावेश करण्यासाठी भारताचा विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर जपान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया आणि तैवान चीनच्या विस्तारवादी धोरणाला सतत विरोध करत आहेत. त्यामुळे जगातील परिस्थिती पाहता सर्वात मोठी सेनापैकी एक असणाऱ्या भारतासोबत युद्ध करणं परवडणार नाही. त्याचप्रमाणे चीनलाही भारतीय बाजार गमावायचा नाही, म्हणूनच चीनने आक्रमक भूमिका सोडली असल्याचे कमर आगा यांनी सांगितले.