दलित अत्याचारावर स्पष्टीकरण द्या
By admin | Published: August 12, 2016 02:55 AM2016-08-12T02:55:36+5:302016-08-12T02:55:36+5:30
दलितांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केली.
नवी दिल्ली : दलितांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केली. रोहित वेमुला व उना यासारख्या प्रकरणातून भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडे गेले आहेत, त्याची भरपाई करण्याचा तोंडी प्रयत्न नरेंद्र मोदींकडून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मायावती म्हणाल्या की, दलितांबाबत पंतप्रधानांनी नुकतेच केलेले वक्तव्याचा काहीही परिणाम झाला नसून, आजही देशभर दलितांवर अत्याचार होतच आहेत. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांत अशा अनेक घटना झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. दलितांबाबत केवळ तोंडी सहानुभूती दाखविण्याऐवजी पंतप्रधानांनी दलितांवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईवर लक्ष केंद्रित करायला हवे. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर बाहेर बोलत असतील, तर याच विषयावर ते सभागृहातही बोलू शकतात, पण ते संसदेत बोलण्याचे जाणूनबुजून टाळत आहेत, असा आरोपही त्यांनी
केला.
गेल्या आठवड्यात काय म्हणाले होते मोदी?
गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले होते की, कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे, माझ्यावर करा. कोणाला गोळ्या घालायच्या असतील तर माझ्यावर घालाव्यात. पण, गोरक्षणाच्या नावाने दलितांवर होणारे हल्ले थांबायला हवेत.
गुजरातमधील उना येथे मृत गायीची कातडी कमावणाऱ्या दलितांना झालेल्या बेदत मारहाणीनंतरही तसे अनेक प्रकार घडले. त्या विषयावरील आपले मौन सोडताना मोदी म्हणाले होते की, गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी दुकानदारी थाटली आहे. राज्य सरकारांनी त््यांची माहिती गोळा करावी आणि त्यांचे उद्योग जनतेसमोर आणावेत. जेवढ्या गायी कत्तल केल्याने मरत नाहीत, त्यापेक्षा अधिक गायी कचराकुंड्यातील प्लास्टिक खाउन मरतात, अशा गायांना वाचविले तरी ती फार मोठी गोसेवा होईल.