पावसाळी अधिवेशनाची वादळी सांगता
By admin | Published: August 14, 2015 12:54 AM2015-08-14T00:54:53+5:302015-08-14T00:54:53+5:30
ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे पाण्यात वाहून गेलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची गुरुवारी वादळी सांगता झाली.
नवी दिल्ली : ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे पाण्यात वाहून गेलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची गुरुवारी वादळी सांगता झाली.
अधिवेशन काळात लोकसभेत काँग्रेसच्या ४४ पैकी २५ सदस्यांना गोंधळामुळे पाच दिवस निलंबित करण्यात आले, तर बुधवारचा दिवस सरकार आणि काँग्रेसने एकमेकांवर केलेल्या प्रहारांनी गाजला.
२१ जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनात काँग्रेस सदस्यांनी दोन्ही सभागृहात ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ केला. राज्यसभेत कुठलेही कामकाज झाले नाही. लोकसभेत मात्र विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत प्रश्नोत्तराचा तास व इतर काही काम झाले.
‘राजीनामा नाही तर चर्चा नाही’ या मागणीवर अडून राहिलेली काँग्रेस अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी लोकसभेत सुषमा स्वराज यांच्याविरुद्ध आणण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चेस तयार झाली.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी लोकसभेत सभात्याग केला. राज्यसभेत नऊ तासांपेक्षा थोडे अधिक कामकाज झाले. अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर रालोआच्या खासदारांनी संसद भवन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत मार्च काढला आणि काँग्रेसतर्फे कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा मुद्दा उपस्थित केला.