Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:29 PM2023-12-06T16:29:08+5:302023-12-06T16:38:33+5:30

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतरही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Explainer BJP delays announcement of cms names despite clear majority in 3 states in assembly polls | Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

देशातील पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला पुन्हा 'अच्छे दिन' आले आहेत. कारण भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांत काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता खेचून आणण्यात आणि मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र निवडणूक निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे नेते असतानाही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या विलंबामागे जी काही कारणे आहेत, त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका हे सर्वांत महत्त्वाचं कारण असण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांना बहुमताचा आकडा पार करण्याची किमया साधली. हीच कामगिरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असून केंद्र सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ज्या राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे, त्या राज्यांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या ६५ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यातील तब्बल ६२ जागा जिंकल्या होत्या. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळेच या तीनही राज्यांत मुख्यमंत्र्यांची निवड करताना भाजपकडून सावध पावलं टाकली जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जास्तीत जास्त निवडून आणू शकेल, असे चेहरे या राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानात वसुंधराराजे आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वांचा पर्याय असतानाही भाजपकडून इतर नेत्यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार केला जात असल्याचे समजते.

राजस्थानात काय आहे स्थिती?

राजस्थानात वसुंधराराजे या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं नेतृत्व करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी वसुंधराराजे यांचं फारसं सख्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. यामुळेच वसुंधराराजे यांना विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पक्षाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं भाजपनं टाळलं होतं. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी वसुंधराराजे यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू असली तरी मोदी-शहा त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवराजसिंह चौहानांबाबत काय होणार?

शिवराजसिंह चौहान यांनी जवळपास २० वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. मध्य प्रदेशात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांचे मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार यंत्रणा राबवत असताना भाजपकडून 'मोदी के मन मे एमपी और एमपी के मन मे मोदी' असं म्हणत संपूर्ण प्रचार मोदी यांच्या भोवतीच फिरेल, यासाठी प्रयत्न केला जात होता. मात्र निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसं कसलेले राजकारणी असलेल्या शिवराजसिंह यांनी आपल्या सत्ताकाळात राबवलेल्या योजनांचे मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करत आपल्याला मुख्य प्रवाहापासून वेगळं केलं जाणार नाही, याची दक्षता घेतल्याचं बघायला मिळालं. त्यातच भाजपला १६३ जागांसह प्रचंड बहुमत मिळाल्याने शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवणं मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तितकसं सोपं असणार नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा चौहान हेच विराजमान होणार की मोदी-शहा धक्कातंत्राचा वापर करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Explainer BJP delays announcement of cms names despite clear majority in 3 states in assembly polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.