दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट, स्फोटामुळे जमिनीत पडला मोठा खड्डा; दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 12:58 PM2021-12-09T12:58:06+5:302021-12-09T14:15:18+5:30
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या रोहिणी कोर्टातून आज एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्रूड बॉम्बचा स्फोट झाला असून, हा कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाचा प्रकार आहे. मात्र, यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून आयईडी, स्फोटके, खिळे आणि टिफिनसारखी वस्तू जप्त केली आहे.
सध्या दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, स्फोटानंतर एनएसजीच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाची नाकेबंदी करून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. याशिवाय रोहिणी न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी थांबवण्यात आली आहे. सध्या दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
स्फोटात दोघे जखमी
दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितल्यानुसार, रोहिणी कोर्टातून सकाळी 10:40 वाजता स्फोटाचा कॉल आला, त्यानंतर 7 अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले. रोहिणी कोर्ट कॅम्पसमध्ये झालेल्या स्फोटामुळे घबराट पसरली असून, स्फोटात 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय लॅपटॉपमुळे हा स्फोट झाला असावा, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले
दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना CAT च्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी रोहिणी जिल्ह्यातील डीसीपी आणि एसीपी आरती शर्मा टीम फोर्ससह रोहिणी कोर्टात पोहोचल्या आहेत. यादरम्यान पोलीस तपास पथकाला न्यायालय क्रमांक 102 मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा स्फोट झाल्याचे आढळले, त्यानंतर लोकांनी गोळीबार झाल्याची अफवा पसरवली होती, त्यामुळे संपूर्ण कोर्टात एकच खळबळ उडाली होती.
रोहिणी कोर्टात गुंडाची हत्या
काही दिवसांपूर्वी हल्लेखोरांनी गोगी टोळीचा गुंड जितेंद्र मान उर्फ गोगी याची रोहिणी न्यायालयात गोळ्या घालून हत्या केली होती. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी गोगीवर हल्ला करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना जागीच ठार केले होते. सध्या रोहिणी न्यायालयात सर्व कामकाज सुरळीत आहे.