धक्कादायक! शिटी खराब झाल्याने प्रेशर कुकरचा मोठा स्फोट; स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:42 AM2023-08-02T11:42:18+5:302023-08-02T11:43:38+5:30
महिला घरात अन्न शिजवत असताना प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजस्थानमधील जयपूरच्या झोटवाडा पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. महिला घरात अन्न शिजवत असताना प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रेशर कुकरचा स्फोट इतका जोरदार होता की कुकरचे तुकडे झाले. ते तुकडे महिलेच्या डोक्यात घुसले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोटवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलवड रोडवर असलेल्या भोमिया नगरमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. भोमिया नगर रहिवासी राजकुमार सिंह यांची 40 वर्षीय पत्नी किरण कंवर स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. त्याचवेळी गॅसवर असलेल्या प्रेशर कुकरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे कुकरचे तुकडे झाले. प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याने स्वयंपाकघरातील सर्व वस्तू खराब झाल्या.
प्रेशर कुकरमधील या स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या घरांपर्यंत ऐकू आला. ते ऐकून लोक घराबाहेर पडले. या घटनेत किरण कंवर यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच झोटवाडा पोलीस ठाणे आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेशर कुकरची शिट्टी खराब झाल्यामुळे कुकरमधून वाफ बाहेर येत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे कुकरच्या आत प्रचंड दाब निर्माण होऊन मोठा आवाज होऊन त्याचा स्फोट झाला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. किरण कंवर यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.