अंतराळात धमाका,राजकारणात भूकंप! भारताचे ‘मिशन शक्ती’ फत्ते...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:47 AM2019-03-28T05:47:17+5:302019-03-28T05:47:32+5:30
अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी पूर्णांशाने यशस्वी करून भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका केला.
नवी दिल्ली : अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी पूर्णांशाने यशस्वी करून भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका केला. मात्र, ऐन निवडणुकांच्या तोंडावर व आचारसंहिता लागू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताने ही चाचणी यशस्वी केल्याची घोषणा करताच राजकारणात भूकंप झाला.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू असताना पंतप्रधानांनी अशी घोषणा करणे अयोग्य होते, निवडणुकांत फायदा मिळावा, यासाठीच मोदी यांनी हे केले, अशी टीका विरोधकांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू असतानाच, पंतप्रधान मोदी यांनी आपण देशाला उद्देशून भाषण करणार असल्याची माहिती टिष्ट्वटद्वारे दिली. त्यामुळे मोदी काय घोषणा करणार, याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले.
देशाच्या गौरवात अभिमानास्पद भर टाकणारी मोहीम भारताच्या वैज्ञानिकांनी फत्ते केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरून देशवासीयांना उद्देशून भाषणात केली. मोदींनी भाषणात ‘मिशन शक्ती’चा आज पहाटे झालेल्या चाचणीचा तपशील दिला नाही. मात्र, ही सिद्धता आक्रमणासाठी नव्हे, तर स्वसंरक्षणासाठीच आहे, अशी ग्वाही मोदी यांनी जगाला दिली.
‘मिशन शक्ती’ आहे काय?
ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटावरील प्रक्षेपण तळावरून एक क्षेपणास्त्र सोडले गेले. या मिशनसाठी भारतानेच पूर्वी अंतराळात सोडलेला व आता वापरात नसल्याने निष्क्रिय असलेला एक उपग्रह हे ‘लक्ष्य’ होते.
पृथ्वीपासून ३०० किमी दूरवरच्या कक्षेत भ्रमण करणारा व ‘लक्ष्य’ म्हणून ठरविण्यात आलेला हा उपग्रह या क्षेपणास्त्राने अचूक वेध घेत, अवघ्या तीन मिनिटांत नष्ट केला.
भारताने काय साधले ?
भारत आता अमेरिका, रशिया व चीन
या तीन देशांच्या पंक्तीत
जमीन, सागर व हवाई पातळीसोबत बाह्य अवकाशातून संभवू शकणारे धोके परतवून लावण्याची कुवत असलेल्या अमेरिका, रशिया व चीन या तीन देशांच्या पंक्तीत बसून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली बिरुदावली प्राप्त केली.
विरोधक काय म्हणाले?
केवळ राजकीय स्वार्थासाठीच मोदी यांनी ही घोषणा केल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली. सर्व विरोधी नेत्यांनी चाचणी यशस्वी झाल्याबद्दल भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले, तर मोदी यांनी जागतिक रंगभूमी दिनी नाटकीपणा केल्याची टीका विरोधक करीत होते.
आचारसंहितेत
अशी घोषणा
करता येते का?
निवडणुकांची आचारसंहिता असताना कोणतीही मोठी घोषणा करण्याची सत्ताधारी नेत्यांना संमती नसते. त्यामुळेच ते काय सांगणार, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. मोदी यांनी उपग्रहवेधी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची माहिती भाषणातून दिल्यावरही ही माहिती वैज्ञानिकांनी व संबंधित खात्याच्या सचिवाने द्यायला हवी होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. काहींनी हा आचारसंहितेचा भंग असल्याची टीकाही केली. मात्र, याचा अभ्यास करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आहे. आयोगाने टिष्ट्वट केले की, बुधवारी दुपारी पंतप्रधानांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केलेले भाषण आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या भाषणाची आचार संहितेच्या अनुषंगाने तपासणी करण्याचे काम समिती करेल.
इतर देश काय म्हणाले?
चीन व पाकिस्तान यांनी या चाचणीबद्दल अतिशय सावध भूमिका घेतली आहे. अवकाश ही कोणा एका देशाची मक्तेदारी नसून, ते सर्वांचेच आहे. त्यामुळे अवकाशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही, ही सर्व देशांची जबाबदारी आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दोन्ही देशांनी दिल्या आहेत.