उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर

By admin | Published: July 15, 2017 12:17 AM2017-07-15T00:17:14+5:302017-07-15T00:17:14+5:30

उत्तरप्रदेश विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार राम गोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ १५० ग्रॅमची स्फोटक पावडर सापडल्याने एकच खळबळ उडाली

Explosive powder found in the Uttar Pradesh Legislative Assembly | उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर

उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर

Next

लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार राम गोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ १५० ग्रॅमची स्फोटक पावडर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्फोटक पीईटीएन (पेंटाएरीथ्रिटाल टेट्रा नाइट्रेट) असून ते अतिशय धोकादायक आहे. या प्रकारामुळे सभागृहाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात सांगितले की, पीईटीएन हा अतिशय धोकादायक पदार्थ आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, ५०० ग्रॅम स्फोटक हे सभागृह उडविण्यासाठी पुरेसे आहे. पीईटीएनचा समावेश प्लास्टिक स्फोटकात केला जातो.
काळ्या बाजारात ते उपलब्ध होते. ते नाइट्रीग्लिसरीनसारखे असते. दहशतवादी संघटना या स्फोटकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग
करतात. कारण, ते रंगहीन असते. बहुतांश स्फोटक डिटेक्टरमध्ये
मेटल डिटेक्टरचा उपयोग केला
जातो. पण, पीईटीएन बंद डब्यात ठेवले जाऊ शकते. याला
विजेच्या उपकरणातही ठेवले जाऊ शकते. सुरक्षा यंत्रणामधून ते सहजपणे घेऊन जाता येते.
डॉग स्क्वॉडही हे स्फोटके ओळखण्यात अपयशी ठरले. ही पावडर १२ जुलै रोजी सभागृहाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सापडली. जगातील अनेक देशात पीईटीएनच्या खरेदीवर बंदी आहे. प्लास्टिक
शिटच्या स्वरुपातही हे घेऊन जाता येते. सैन्य आणि खाण उद्योगात पीईटीएनचा उपयोग नियमांच्या आधारे होतो. (वृत्तसंस्था)
>दहशतवादी कटाचा भाग?
विधानसभेत सापडलेल्या स्फोटक प्रकरणाची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी करण्याची शिफारस सभागृहाने सर्वसहमतीने
केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही पाऊडर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. हा अतिरेकी कटाचा भाग असू शकतो. सत्य समोर यायला हवे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही.आमदार आणि मार्शल यांच्याशिवाय कोणालाही सभागृहात येण्याची परवानगी नाही. सुरक्षा एजन्सीत समन्वयाचा अभाव असून,अतिरेकी हल्ला झाला तर सभागृहात त्याला प्रतिकार करण्याची कोणतीच यंत्रणा नाही.
>काय आहे पीईटीएन?
तज्ज्ञांनी सांगितले की, पीईटीएनचा (पेंटाएरीथ्रिटाल टेट्रा नाइट्रेट) थेट उपयोग स्फोटक म्हणून करता येत नाही. त्याचे स्फोटक करण्यासाठी त्याला अन्य उपकरणांची आवश्यकता असते. गत काही वर्षात पीईटीएनचा उपयोग बॉम्बस्फोटात करण्यात आला आहे. जगभरातून पीईटीएनच्या मदतीने स्फोट केल्याचे वृत्त येत असते. २०११ च्या दिल्ली उच्च न्यायालय परिसरातील स्फोटात पीईटीएनचा उपयोग करण्यात आला होता. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता.
>विधानभवन उडविण्याची धमकी देणाऱ्यास अटक
लखनौमधील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या फरहान अहमद या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक चिरंजीवी सिन्हा यांनी सांगितले की, त्याच्याकडून मोबाइल व खोट्या पत्त्यावर घेतलेले सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. ६ जुलै रोजी फरहानने विधानभवन उडविण्याची धमकी दिली होती. तो देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना पोलीस ठाण्यांतर्गतच्या कवलाछापर गावातील रहिवासी आहे. फरहानने अपर पोलीस महासंचालक अभय प्रसाद यांना फोन करुन १५ आॅगस्ट रोजी विधानभवन उडविण्याची धमकी दिली होती.

Web Title: Explosive powder found in the Uttar Pradesh Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.