हवाईतळावर डागली दोन ड्रोनमधून स्फोटके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:09 AM2021-06-28T06:09:26+5:302021-06-28T06:10:01+5:30
जम्मूतील घटनेत दोन जवान जखमी
जम्मू : येथील विमानतळावरील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. शनिवारी रात्री १.४० वाजता सहा मिनिटाच्या आत दोन स्फोट झाले. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात भारतीय वायुदलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. पहिला स्फोट शहरालगच्या सतवारी भागातील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावरील अत्यंत सुरक्षित एक मजली इमारतीत तर दुसरा खुल्या जागेत झाला.
जम्मूतील भारतीय वायुदलाच्या तळावरील हा दहशतवादी हल्लाच आहे, असे जम्मू-काश्मीर पोलीसप्रमुख दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) दहशतवादी तपास पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे, असे दिलबाग सिंह यांनी सांगितले. या
ड्रोनने कोठून उड्डाण केले आणि त्यांचा मार्ग कसा होता, याचाही तपास केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू विमानतळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून जम्मू विमानतळाचे हवाई अंतर १४ किलो मीटर आहे. या घटनेप्रकरणी बेकायदेशीर कारवया प्रतिबंधक कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एनआयएकडे तपास दिला
पठाणकोट जिल्ह्यात सतर्कता
n जम्मू विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या सीमावर्ती पठाणकोट जिल्ह्यात सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला आहे.
n सर्व संवेदनशील भागात आणि पठाणकोट सभोवतालच्या परिसरात गस्त वाढविण्यात आली असून अतिरिक्त दले तैनात करण्यात आली आहेत, असे पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लाम्बा यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी पठाणकोटस्थित हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता.
दुसरा मोठा हल्ला टाळला
n ड्रोन हल्ल्याचा अधिकारी तपास करीत असताना सहा किलो स्फोटकांसह एका व्यक्तीला जेरबंद करुन दुसरा मोठा हल्ला टाळण्यात आला. अटक करण्यात आलेली व्यक्तील लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असावी, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. या संशयित व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.