भारतातून वर्षभरात सव्वाचार कोटी टन कृषी मालाची निर्यात; गहू निर्यातीचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:55 AM2022-07-08T07:55:28+5:302022-07-08T07:55:43+5:30
१ लाख ८४ हजार कोटींची उलाढाल : तांदळाची सर्वाधिक निर्यात
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे आर्थिक वर्षात कृषी मालाची निर्यात वाढली आहे. २०२१-२२ मध्ये देशातून तब्बल ४ कोटी २७ लाख ६३८५६ टन कृषी माल निर्यात झाला असून, १८ लाख ४७ हजार ७६९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तांदळाची निर्यात सर्वाधिक असून, वर्षभरात गहू निर्यातीमध्ये विक्रमी तीनपट वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव मिळावा व कृषी व्यापारातून जास्तीत जास्त विदेशी मुद्रा प्राप्त व्हावी यासाठी शासनाकडून निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. कोरोनामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात अपेक्षित निर्यात झाली नव्हती. २०२१-२२ या वर्षात कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे निर्यातीला गती मिळाली होती. वर्षभरात फळे, भाजीपाला, अन्नधान्य, प्रक्रिया केलेल्या वस्तू १०० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या.
वर्षभरात तांदळाची सर्वाधिक निर्यात झाली आहे. १ कोटी ७२ लाख ६२ हजार २३५ टन बिगरबासमती व २९८४९ टन बासमती तांदळाची निर्यात झाली. दोन्ही मिळून ७२ हजार ६८ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
वर्षभरात गहू निर्यातीमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात २० लाख ८८ हजार ४८७ टन निर्यात झाली होती. २०२१-२२ मध्ये तब्बल ७२ लाख ३९ हजार ३६६ टन निर्यात झाली आहे. गहू निर्यातीची उलाढाल ४०३७ कोटींवरून १५ हजार ८४० कोटी झाली आहे. रशिया व युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय गव्हाला मागणी वाढली आहे. भारतीय शेतीमालाला जगभरातून मागणी वाढू लागली आहे.
कृषी माल व प्रक्रिया केलेल्या वस्तूंना जगभरातून मागणी वाढली आहे. आर्थिक वर्षात रशिया व युक्रेन युद्धामुळे गव्हाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव - द ग्रेन, राईस व ऑईलसीड मर्चंट असो.