निर्यात क्षेत्रात २०२२ पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:10 AM2021-08-08T06:10:28+5:302021-08-08T06:10:40+5:30

मोदी यांचा परदेशातील भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी, व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

Exports target of 400 billion by 2022 | निर्यात क्षेत्रात २०२२ पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

निर्यात क्षेत्रात २०२२ पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

Next

मुंबई : कोरोनाने थैमान घातले असतानाच भविष्यातील आर्थिक  आणि व्यापार क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत निर्यात क्षेत्रात २०२२ पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्याचे निर्धारित केले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहारमंत्रीदेखील या संवादसत्रात सहभागी झाले होते, तसेच विविध विभागांचे सचिव, राज्य सरकारांचे अधिकारी, व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

या बैठकीला जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, औषध, रसायन आणि मत्स्य क्षेत्राशी निगडित वाणिज्य कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशभरातील निर्यातदारदेखील उपस्थित होते. माहिती - तंत्रज्ञान, जेम्स अँड ज्वेलरी आणि औषध क्षेत्रातील चर्चेवर यात प्रामुख्याने भर देण्यात आला. १४२ पेक्षा अधिक देशांच्या भारतीय दूतावासांनी उपस्थिती दर्शविलेल्या बैठकीत संबंधित देशात व्यापाराच्या काय संधी आहेत, याची माहिती मांडली गेली. यात बांगलादेश, युकेसारख्या देशांचा समावेश होता. यावेळी भारतातून विकसित होत असलेले ड्रॅगन फळ ब्रिटनमध्ये कसे निर्यात करता येईल, यावर भर देण्यात आला. गुजरातमधील कच्छमध्ये ड्रॅगन फळाचे उत्पादन घेतले जात असल्याचे व्यापारी वर्गाने लक्षात आणून दिले.

४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे आपापल्या देशात काय करता येईल, याचा अहवाल सादर करणार असल्याचे दूतावासांनी नमूद केले. शिवाय बहुतांश शिष्टमंडळे विविध राज्यांत दाखल होत दोन देशांमध्ये काय संभाव्य व्यापार करता येऊ शकतो, याची माहिती घेणार आहेत. सर्व विभाग, सर्व अधिकारी, देशभरातील उद्योगपतींचे सहकार्य यासाठी होत आहे. जगभरात कोरोनाचे थैमान असल्याने वाहतुकीवर गदा आली. याच काळात चीनमध्ये आयातीवर बंदी आली आहे. भारत-चीन सीमा वाद उफाळून आला होता. तरीही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येत आहे. असे असले तरी ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्यावर बैठकीत जोर देण्यात आला.

७५ अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठणार - किरिट भन्साळी 
कोरोना काळातही जेम्स अँड ज्वेलरी, डायमंड क्षेत्राने उत्तम काम केले असून, या क्षेत्राला हे वर्ष सुगीचे ठरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आम्ही अधिकाधिक लक्ष्य निर्धारित करणार आहोत, असे या बैठकीच्या निमित्ताने हिरे व्यापारी किरिट भन्साळी यांनी सांगितले.
जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रासाठी ४४ अब्ज एवढे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीचा विचार करता विशेषत: अमेरिका आणि चीनकडे पाहता पंतप्रधानांचे व्हिजन आम्ही नक्कीच गाठू, असा विश्वास असल्याचे सांगत पाच वर्षांत जेम्स अँड ज्वेलरीचे ७५ अब्ज डॉलर्सचे गाठण्याचे लक्ष्य असल्याचे किरिट भन्साळी यांनी सांगितले. 

Web Title: Exports target of 400 billion by 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.