जेरुसलेमवरून अमेरिका संयुक्त राष्ट्रांत एकाकी, मध्य-पूर्वेत तणावाची भीती व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:04 AM2017-12-10T01:04:47+5:302017-12-10T01:13:15+5:30
जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले.
संयुक्त राष्ट्रे : जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले. जेरुसलेमला मान्यता दिल्याने मध्य-पूर्वेत तणाव वाढू शकेल, अशी भीती अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेने जेरुसलमेला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर, सुरक्षा परिषदेतील १५ पैकी ८ सदस्य राष्ट्रांनी या विषयावर तातडीच्या बैठकीची मागणी केली होती. अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातील शांतता बिघडण्याची भीतीही या राष्ट्रांनी व्यक्त केली होती.
बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात पाच युरोपीय देशांनी म्हटले आहे की, जेरुसलेमच्या दर्जाबाब पॅलेस्टाइन व इस्रायल यांच्यातील वाटाघाटींमधूनच उपाय निघायला हवा. जेरुसलेम ही इस्रायल व पॅलेस्टाइन या दोहोंची राजधानी असल्यामुळे त्यांच्यामधील वाटाघाटींतूनच त्यावर तोडगा निघू शकेल. तसे होईपर्यंत युरोपीयन युनियन जेरुसलेमच्या सार्वभौमत्त्वाला मान्यता देऊ शकत नाही.
मात्र, अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हॅले यांनी मात्र संयुक्त राष्ट्रे इस्रायलचा द्वेष करणारी एक केंद्र बनली आहेत, असा आरोप करीत अमेरिकेची बाजू जोरात मांडली. (वृत्तसंस्था)
हिंसाचारात वाढ होण्याची भीती
बैठकीच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रांचे मध्य-पूर्वेतील विशेष प्रतिनिधी निकोलाय म्लादेनोव्ह यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या कृतीमुळे भविष्यातील धोके निर्माण होतील, हिंसक घटना वाढतील, अशी भीती व्यक्त केली.